संतोषकुमार गवई
पातूर: ग्रामीण भागातील क्रीडा पटुंना संधी उपलब्ध व्हावी, यासाठी तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली. शहरातील क्रीडा संकुलची दुर्दशा झाली असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दरम्यान, शहरातील क्रीडा संकुल अपुऱ्या जागेत असून, अर्धवट बांधकामामुळे मूळ उद्देशालाच बगल बसल्याचा वास्तव समोर आले आहे.
येथील तालुका क्रीडा संकुल केवळ सव्वा दोन एकर जागेत उभारले असून, क्रीडा संकुलाला आवार भिंत नाही, क्रीडा प्रशिक्षक नाहीत. तसेच येथे कोणीही कर्मचारी नसल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. या क्रिडा संकुलचा प्रभार गणेश कुलकर्णी यांच्याकडे असून, कुलकर्णी यांच्याकडे पातूर तालुक्यासह, बाळापूर, मूर्तिजापूर व अकोला तालुक्याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. क्रीडा संकुलच्या दयनीय अवस्थेमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याची संधी हिरावली गेली असल्याचे वास्तव समोर आले आहे. क्रीडा संकुल अनेक समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. क्रीडा संकुलमध्ये केवळ २०० मीटर असलेली धावपट्टी आहे. क्रीडा संकुल कमी जागेत असल्याने येथे विविध प्रकारचे खेळाची मैदाने उभारण्यासाठी अडचण आहे. पातूर तालुका क्रीडा संकुलला आवार भींत नसून, येथे पुर्णवेळ क्रीडा अधिकारी नाही. संकुलात सुविधा उपलब्ध नसल्याने खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. (फोटो)
--------------------------------------
समस्यांचा विळखा
क्रीडा संकुलाला आवार भींत नसल्याने संकुलाच्या पटांगाणातून परिसरातील मोकाट गुरे वास्तव्यास असतात. तसेच येथील पटांगणात अस्वच्छतेचे साम्रज्य निर्माण झाले असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. क्रीडा संकुलमध्ये स्वच्छता गृह, पाण्याची सूविधा नाही. त्यामुळे येथे सराव करणाऱ्यांची संख्या ही मोजकीच असते.