पीएम किसान योजनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महसूल क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्याची दखल न घेतल्यामुळे मनोधैर्य खचल्याची संतप्त भावना विदर्भ पटवारी संघाचे बाळापूर उपविभागीय अध्यक्ष अमित सबनीस यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार डिसेंबर २्१८ पासून पीएम किसान सन्मान योजना कार्यान्वित झाली. योजनेसाठी वर्षभरात शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा मदत निधी दिला गेला. पीएम किसान सन्मान योजनेसाठी पात्र लाभार्थींची निवड करण्याच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. क्षेत्रीय स्तरावर लाभार्थी निवड माहिती संकलित करणे, ऑनलाइन फिडिंग करणे आदी भूमिका क्षेत्रीय अधिकारी आणि तलाठी यांना पार पाडली. सदर यंत्रणेमध्ये ग्रामसेवक एक आणि कृषी साहाय्यक एक अशी त्रिस्तरीय यंत्रणा गठीत करण्यात आली होती. मात्र ग्रामसेवक संघटनेने बहिष्कार घातला होता. कृषी विभागाचेही सहकार्य लाभले नाही. मात्र पीएम किसान योजना पार पाडण्याची जबाबदारी महसूल विभागावर येऊन पडली. मात्र, केंद्र सरकारच्या कृषी विभागाने पीएम किसान योजनेचे काम सर्वोत्तम पद्धतीने कृषी विभागाने पार पाडल्यामुळे त्याचे पारितोषिक कृषी विभागाला देण्यात आले. महसूल विभागाची दखलही पुरस्कार वितरण सोहळ्यात घेतल्या गेली नाही. त्यामुळे महसूल विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचल्याची संतप्त प्रतिक्रिया विदर्भ पटवारी संघाचे उपविभागीय अध्यक्ष अमित सबनीस यांनी व्यक्त केली
पीएम किसान योजना राबविली महसूल विभागाने, बक्षीस मात्र, कृषी विभागाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:33 AM