अकोला, दि. २४- शिवाजी नगर येथील रहिवासी गजानन चोपडे यांना चार आरोपींनी संगनमताने जबरदस्तीने विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला होता; मात्र विषारी औषध पोटात गेल्याने गंभीर प्रकृती असलेल्या चोपडे यांचा सोमवारी सवरेपचार रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर जुने शहर पोलिसांनी रात्री उशिरा चार आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.शिवाजीनगर येथील रहिवासी गजानन ऊर्फ गणेश हरिदास चोपडे यांना अवैध सावकारीच्या कारणावरून २३ ऑगस्ट रोजी पप्पू वानखडे आणि रुपेश वानखडे व आणखी दोन साथीदारांनी जबरदस्तीने विष पाजल्याचा आरोप गजानन चोपडे यांच्या पत्नीने जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये केला होता. यावरून पोलिसांनी पप्पू वानखडे, रुपेश वानखडे व आणखी दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0७ नुसार गुन्हा दाखल केला होता, तर विषारी द्रव्य पोटात गेल्याने गंभीर प्रकृती झालेल्या चोपडे यांच्यावर सुरुवातीला खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते; मात्र प्रकृतीत सुधारणा झाल्याने आणि उपचाराचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांच्या पत्नीने गजानन चोपडे यांना खासगी रुग्णालयातून सवरेपचार रुग्णालयामध्ये हलविले. रविवारी रात्रीनंतर चोपडे यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात आले; मात्र सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चोपडे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी ३0७ या कलमामध्ये भारतीय दंड विधानाच्या कलम ३0२ नुसार खुनाचा गुन्हय़ात वाढ केली. गजानन चोपडे यांच्या खून प्रकरणात पप्पू वानखडे, रुपेश वानखडे व त्याच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र यामधील आरोपीस अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
विष पाजून इसमाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2016 3:01 AM