पारस : येथील संग्राम राठोड या पशुपालकांच्या ५० काठेवाडी गायींना बीटी कपाशीच्या बोंड्या खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. त्यामुळे पशुपालकावर संकट ओढवले आहे.पारस येथील संग्राम राठोड यांचा काठेवाडी गोपालनाचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. गत अनेक वर्षांपासून पारस येथे स्थायिक झालेल्या संग्राम राठोड व त्यांचे बंधू यांनी जवळपास शंभर काठेवाडी जनावरांचे पालन केले आहे. सदर पालनातून राठोड कुटुंबीय दूध व्यवसाय करतात. बीटी कपाशी पेरलेल्या शेतामध्ये त्यांनी १८ फेब्रुवारी रोजी गायी चारायला नेल्या. घरी आल्यानंतर त्यातील काही गायींना विषबाधा झाल्याचे लक्षात आले. जवळपास ५० गायी बाधित झाल्याने संग्राम राठोड यांच्यावर संकट कोसळले. त्यांनी पशू चिकित्सक अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन औषधोपचार सुरू केला. सध्या काही गायी या मरणावस्थेत असून, काही गायींच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.काही जनावरे दुधाळ असून, दुधाळ जनावरांचे दूध देणे बंद झाले आहे. त्यामुळे राठोड यांच्या दूध व्यवसायावरही फरक पडला आहे. राठोड यांचे नुकसान झाल्याने त्यांना मदत देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
बीटी कपाशी खाल्याने ५० गायींना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:10 PM