अकोट : बहरलेल्या पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकरी फवारणीच्या कामात व्यस्त आहेत. अकोट तालुक्यातील चौघांना फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेतातील पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढू लागताच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कीटकनाशक फवारणीला सुरुवात केली आहे. शेतकरी, शेतमजूर सुरक्षा किटविनाच फवारणी करीत असल्याचे वास्तव आहे. अकोट तालुक्यातील ग्राम गरसोळी येथील चार जणांना विषबाधा झाली असून, सर्वांवर अकोला येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये मंगेश तरोळे, नितीन तरोळे, दीपक तरोळे आणि आदिवासी मजूर अनू पाटील अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. त्यापैकी एकाची स्थिती गंभीर असल्याची माहिती आहे. शेतात फवारणी करताना मिश्र कीटकनाशक रसायनांचा वापर धोकादायक ठरू शकतो. असे असतानाही जनजागृतीअभावी शेतकरी, शेतमजूर बिनधास्तपणे फवारणी करतात. कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी न घेतल्याने शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. तीन वर्षांपूर्वी विषबाधेने शेतकरी, शेतमजुरांच्या मृत्यूने यवतमाळ जिल्हा चांगलाच हादरला होता. कीटनाशक फवारणीचे विदारक वास्तवही पुढे आले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यात कृषी विभाग व महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांनी कशाप्रकारे फवारणी करावी, याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात आले; मात्र शेतकरी, शेतमजुरांपर्यंत सुविधा पोहोचविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.
-----------------------
फवारणीच्या कामांना वेग; जनजागृतीची गरज
बहरलेल्या पिकांवर किडींचे आक्रमण वाढल्याने शेतकऱ्यांचा कल फवारणीकडे वाढला आहे. ग्रामीण भागात एकाच व्यक्तीच्या खांद्यावर फवारणीचा भार येत आहे. सुरक्षेसाठी त्याला कोणत्याही प्रकारची उपकरणे पुरविली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे खरीप हंगामातील फवारणी शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. प्रशासनाने ग्रामीण भागात जनजागृती करण्याची गरज आहे.