अकोला : अकोला ते अकोट राष्ट्रीय महामार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू असताना मौजे बडेगाव राखीव वनात विनापरवाना मातीचे उत्खनन करणारा पोकलेन जप्त करण्यात आला आहे. तब्बल ५० लाख रुपये किमतीचा हा पोकलेन जप्त करण्यात आला असून, मशीन चालकाविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र कातखेडे यांनी ही कारवाई केली.अकोला ते अकोट राष्ट्रीय महामार्गावर रुंदीकरणाचे काम झपाट्याने सुरू आहे; मात्र हे काम सुरू असताना पोकलेन चालकाने अकोला वन विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या बडेगाव येथील राखीव वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन सुरू केले होते. हा प्रकार अकोला वन परिक्षेत्र अधिकारी कातखेडे यांना माहिती पडताच त्यांनी पथकासह घटनास्थळावर धाव घेतली, त्यानंतर जागेचा पंचनामा करण्यात आला. चारही बाजूंनी सूक्ष्म तपासणी केल्यानंतर बडेगाव वन परिक्षेत्रात विनापरवाना अवैधरीत्या उत्खनन झाल्याचे उघड झाले. १६ मार्च रोजी पोकलेन मशीनच्या चालकाविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यात आली असून, अवैधरीत्या उत्खनन झाल्याचे उघड झाले आहे. तब्बल ५० लाख रुपये किमतीचा हा पोकलेन जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अकोला वन विभागाचे उपवनसंरक्षक सुधीर वळवी, सहायक वनसंरक्षक संजय पर्डीकर यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी आर. एस. कातखेडे, वनपाल अजय बावने यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.