लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नेहरू पार्कचौक परिसरातील हॉटेल चालकांवर शुक्रवारी रात्री खदान पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून, त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नेहरू पार्क चौकातील हॉटेलमध्ये बाहेरून मद्याच्या बाटल्या आणून मद्यपी तेथेच येथेच्छ मद्य प्राशन करतात. येथील सर्वच हॉटेलला परवाना नसतानाही बारचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे नेहरू पार्क चौकामध्ये रात्रीच्या वेळेस मद्यपींची मोठी गर्दी होते. यातून अनेकदा वादविवाद, हाणामारीच्या घटनासुद्धा घडल्या आहेत; परंतु पोलीस त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत होते. शुक्रवारी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील, खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी संयुक्तरीत्या नेहरू पार्क चौकातील हॉटेल एन्जॉय, मिलन, गोल्डीचा पंजाबी ढाबा तसेच गोरक्षण रोडकडे जाणार्या मार्गावरील व्यावसायिकांवर कारवाई केली. यावेळी अनेक मद्यपी पार्सलमधील दारू पिण्यात मग्न होते. हॉटेलसमोर उभ्या केलेल्या ५५ दुचाकीस्वारांवर सुद्धा दंडात्मक कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईमुळे हॉटेलमधील मद्यपींची एकच धावपळ उडाली. कारवाईदरम्यान पोलिसांना काही हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचे दिसून आले. या हॉटेल मालकांवर पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाई करून गॅस सिलिंडर जप्त केले आणि मद्यपींना पुन्हा मद्य प्राशन करण्यासाठी हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये, अशी हॉटेल मालकांना ताकीद दिली.
नेहरू पार्क चौकातील हॉटेल चालकांवर पोलीस कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 2:12 AM
नेहरू पार्कचौक परिसरातील हॉटेल चालकांवर शुक्रवारी रात्री खदान पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून, त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
ठळक मुद्देविनापरवाना हॉटेलमध्ये मद्य प्राशन ५१ वाहन चालकांवर कारवाई