अकोला : सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रणपिसे नगर, शास्त्रीनगर परिसरात सुरू असलेल्या तीन कॅफेवर पोलिसांनी कारवाई करीत पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
शास्त्री नगर परिसरातील इट अँड मीट कॅफेमध्ये काही युवक असभ्य वर्तन करीत असल्याची माहिती सिविल लाईन्स पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी इट अँड मिट कॅफेवर छापा टाकून श्रेयश मेश्राम, मुकेश पवार व सनी मेश्राम या तिघांना असभ्यवर्तन करीत असताना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध सिविल लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर याच परिसरात असलेल्या ह्यॅवेन कॅफेवर छापा टाकून पोलिसांनी अभिषेक हिरुळकर या युवकास ताब्यात घेउन गुन्हा दाखल केला. त्यानंतर रणपिसे नगर मध्ये असलेल्या जॉईट टाईम कॅफेमध्ये घरगुती वापराच्या सिलेंडरचा व्यावसायिक वापर करीत असल्याची माहिती सिविल लाईन्स पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांना मिळाली.
या माहितीवरून त्यांनी कॅफेच्या मालकीणसह उमेश मोरवाल रा. जेतवन नगर याच्याविरुद्ध सिव्हिल लाईन्स पोलिसांनी कारवाई केली आहे. या परिसरातील नेट कॅफेसह विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी असलेल्या कॅफेमध्येही असभ्य व अश्लील वर्तन होत असल्याच्या तक्रारी सिव्हिल लाईन्स पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी या परिसरातील कॅफेवर नजर ठेवली आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या कॅफेंवर कारवाई करून तेथे असभ्य वर्तन करणाऱ्या युवकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. ही कारवाई सिविल लाईन्स पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.