अकोला : जीएमडी मार्केट येथील दत्त मेडिकलमध्ये कामाला असलेल्या नीलेश भाकरे नामक युवकास जुने शहर पोलिसांनी शिवसेना वसाहतनजीक बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. यावेळी पोलिसांनी युवकाचा मोबाईलही फोडला असून त्याला नालीत पडेपर्यंत मारहाण केल्याने अकोला पोलिसांचे संतुलन बिघडल्याचे दिसून येत आहे.
नीलेश भाकरे हे जुने शहरातील एका मेडिकलवर औषध साहित्य पोहोचून देण्यासाठी रविवारी सायंकाळी जात होते. या दरम्यान शिवसेना वसाहतनजीक पोलीस बंदोबस्तात असलेल्या काही पोलिसांनी त्यांना अडवले. भाकरे यांनी जवळ असलेल्या मेडिकलची पिशवी त्यांना दाखवली; मात्र तरीही पोलिसांनी काहीही न ऐकता नीलेश भाकरे यांना काठीने बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत त्यांच्या अंगावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत. त्यानंतर नीलेश भाकरे यांनी मेडिकलमध्ये काम करीत असल्याचे वारंवार सांगितले; मात्र तरीही पोलिसांनी त्यांचा मोबाईल फोडत बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नीलेश भाकरे यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्या हातावर, पायावर, पाठीवर व डोक्यावर काठीने मारहाण केल्याचा गंभीर जखमा आहेत. यावरून अकोला पोलीस श्रीमंतांना सोडून गरिबांना बेदम मारहाण करीत असल्याचे वास्तव आहे.
पोलिसांची दंडेलशाही श्रीमंतांना मुभा गरिबांना दंडुके
शहरातील श्रीमंत वस्तीत इव्हिनिंग वाक व मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची प्रचंड गर्दी आहे. त्यांच्यावर एकही कारवाई होत नसल्याचे वास्तव आहे; मात्र एका मेडिकलवर काम करणारा युवक औषधी साहित्य पोहोचून देत असतानाही त्याला अडवून बेदम मारहाण केल्याने अकोला पोलिसांची दंडेलशाही श्रीमंतांना मुभा देणारी तर गरिबांना दंडुके देणारी असल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे अकोला पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली आहे.
ह्यूमन राइट्स कमिशन, पोलीस महासंचालकांकडे करणार तक्रार
जुने शहर पोलिसांनी औषधी दुकानावर काम करणाऱ्या एका युवकास बेदम मारहाण केल्याची तक्रार ह्यूमन राइट्स कमिशन तसेच पोलीस महासंचालकांकडे करणार असल्याची माहिती आहे. अकोला पोलिसांचे श्रीमंतांना अभय आहे; मात्र अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एका युवकांस बेदम मारहाण केल्याने या प्रकरणाची तक्रार ह्यूमन राइट्स कमिशन व पोलीस महासंचालक यांच्याकडे करणार असल्याची माहिती समोर आली आहे.