अकोला : अकोला सराफा बाजार शुद्ध सोने तसेच प्रामाणिकतेमध्ये राज्यात नावाजलेला असतानाच आता काही विशिष्ट पोलीस अधिकाऱ्यांकडून सराफांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. अकोला पोलिसांचा चोरांवर विश्वास आहे; मात्र प्रामाणिकपणे व्यापार करीत असलेल्या सराफांवर विश्वास नसल्याचा आरोप अकोला सराफा असोसिएशनचे अध्यक्ष विजय वाखारकर, सचिव सुशील शहा, कोषाध्यक्ष निहार अग्रवाल, सदस्य मनीष हिवराळे, शैलेष खरोटे, अमोल मुंडगावकर व प्रकाश सराफ यांच्यासह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी केला. सराफा असोसिएशनचे एक शिष्टमंडळच सोमवारी ‘लोकमत’ कार्यालयात आले होते यावेळी सदर प्रकरणाची माहिती देताना त्यांनी हे आरोप केले.या संदर्भात माहिती देताना शिष्टमंडळाने सांगीतले की, खदान पोलीस चोरट्यांना घेऊन सराफा बाजारातील एका दुकानात आले होते. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सदर सराफा व्यावसायिकाने सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजू वर्मा यांना बोलावले. वर्मा सदर सराफा दुकानावर गेले असता चोरट्याने संबंधित सराफा व्यावसायिकास सोडून वर्मा यांचेच नाव घेतले. चोरट्याने वर्मा यांच्याकडे बोट दाखवून यांनाच सोने विक्री केल्याचे सांगितल्यावर खदान पोलिसांनी चोरट्याच्या आरोपावर विश्वास ठेवला; मात्र शहानिशा केली नाही. वर्मा यांच्या दुकानात सीसी कॅमेरे लागलेले आहेत, ते तपासणी केली नाही. चोरट्याच्या म्हणण्यानुसार त्याने तीन ते चार वेळा कॉल केला. त्यामुळे कॉल केला की नाही, हे तपासण्यासाठी सीडीआर काढण्याची मागणी असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी केली. तसेच या प्रकरणाचा तपास खदानऐवजी दुसºया कोणत्याही पोलिसांनी केल्यास सत्य समोर येणार असल्याचेही सराफा असोसिएशनचे म्हणणे आहे. खदान पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी पूर्वग्रहदूषित कारवाई करीत असून, यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारच्या मोडस आॅपरेंडीद्वारे सराफांवर दबाव निर्माण केला होता. खदान पोलिसांच्या कारवाई विरोधात सराफा असोसिएशनने शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांची भेट घेतली असता त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सदर सराफा पुन्हा खदान पोलीस ठाण्यात गेले असता खदान पोलिसांनी वर्मा यांना कारागृहात टाकतो किंवा ९० ग्रॅम सोने परत करा, असे दोनच पर्याय दिले. अशातच वर्मा यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी सोने परत करण्याचा निर्णय घेतला; मात्र यावेळीच शहर पोलीस उपअधीक्षकांनी वर्मा यांना त्यांचा दोष नसेल तर १५ दिवसांच्या आत सोने परत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे वर्मा यांनी ९० ग्रॅम सोने पोलिसांकडे दिले; मात्र खदान पोलिसांनी शहानिशा न करता सराफांना बदनाम करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना अंधारात ठेवून स्वत:चे नाव मोठे करण्यासाठी तसेच एका वेगळ्या उद्देशाने राजू वर्मासह काही सराफांना या प्रकरणात गोवण्याचा डावच आखल्याचा आरोप या असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी केला आहे. या प्रकरणात राजू वर्मा तसेच सराफाचा सहभाग दूरदूरपर्यंत नाही; मात्र खदान पोलीस काही सराफांवर असलेले पूर्ववैमनस्य काढण्यासाठीच हा खटाटोप करीत असल्याचा आरोप सराफा असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व पदाधिकाºयांनी केला आहे.