लोकमत न्यूज नेटवर्कहिवरखेड (अकोला): जंगलाच्या मार्गे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी व कत्तलीसाठी आणत असलेली ३५ गुरे व ८ वाहनांसह २0 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी २८ नोव्हेंबर रोजी जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात गुरांची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत असल्याचे सिद्ध झाले. मध्य प्रदेशातून तलाई गेट ते बारुखेडा मार्गे महाराष्ट्रात गुरे कोंबुन गाड्यांमध्ये भरून आणल्या जात असल्याच्या गुप्त माहितीवरून हिवरखेड पोलिसांनी २७ नोव्हेंबरच्या रात्रीदरम्यान सापळा रचला. त्या अनुषंगाने बारुखेडा ते झरी गेट यादरम्यान प्रत्येक वाहनाला अडवून त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान एक, दोन नव्हे तर तब्बल ८ वाहनांमध्ये गुरे कोंबुन आणण्याचा प्रकार उघडकीस येताच ठाणेदार विकास देवरे यांनी समयसुचकता बाळगून उपविभागीय पोलीस अधिकारी, आर.सी.पी. पथक, क्यू.आर.टी. पथक यांना पाचारण केले. त्यांच्या सहकार्याने ८ वाहनांमधील तब्बल ३५ गुरांना ताब्यात घेतले. यादरम्यान अंधाराचा फायदा घेऊन वाहनचालक पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईमध्ये ८ पीकअप वाहने व ३५ गुरे असा एकूण २0 लाख रुपयांचा मुद्देमाल हिवरखेड पोलिसांनी जप्त केला आहे. गेल्या अंदाजे १0 वर्षातील पोलिसांची ही सर्वात मोठी धाडसी कारवाई असून, यामुळे गुरांची तस्करी करणार्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात ये-जा करण्यासाठी तलाई गेट व वान गेट हे दोन वन विभागाचे गेट ओलांडावे लागतात. हे दोन्ही गेट व्याघ्र प्रकल्पामुळे रात्री ७ वाजतानंतर बंद ठेवण्याचे आदेश वन विभागाला असल्याचे समजते. मग रात्री ७ नंतर या तस्कारांसाठी हे गेट कसे उघडल्या जातात व का उघडल्या जातात, असा प्रश्न याप्रसंगी निर्माण झाला आहे.या कारवाईमध्ये हिवरखेड पोलिसांनी १0 पोलीस अधिकारी व ५0 पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य घेतले असून, प्राणी संरक्षण कायदा ५, ५ अ, ९, ९ अ, ११ अ.ड.फ. प्राण्यांची निर्दयतेने वाहतूक करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेली सर्व गुरे अकोट गोरक्षण सेवा संस्था येथे रवाना करण्यात आली आहेत. कारवाईमध्ये हिवरखेडचे ठाणेदार विकास देवरे, पीएसआय शरद भस्मे, गोपाल दातिर, नंदु सुलताने, नीलेश बोरकुटे, गितेश कांबळे, नीलेश तायडे, शे. अनवर, अमोल पवार, विलास अस्वार या पोलीस कर्मचार्यांचा सहभाग होता.
परराज्यातून होणार्या गुरांच्या तस्करीवर पोलिसांची धाडसी कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 7:43 PM
जंगलाच्या मार्गे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी व कत्तलीसाठी आणत असलेली ३५ गुरे व ८ वाहनांसह २0 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी २८ नोव्हेंबर रोजी जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात गुरांची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत असल्याचे सिद्ध झाले.
ठळक मुद्दे३५ गुरे, ८ गाड्यांसह २0 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त!वन विभागाची भूमिका संशयास्पद