अकोला, दि. २७- खेडकर नगरमधील रॉयल पॅलेस येथील रहिवासी अम्रिता वडतकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी पती योगेश वडतकर याला सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अटक करून मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अम्रिताचा पती योगेश वडतकर, सासरे मधुकरराव वडतकर, सासू सुशीला मधुकरराव वडतकर तसेच तीन नणंद सुनीता कडू, मंजू मेघे, आशा बारब्दे या सातत्याने पैशासाठी तिचा छळ करीत होते व वेळोवेळी आईकडून पैसे घेऊन ये, असा दबाव आणून तिला नेहमी मारहाण करीत होते. अशातच २५ सप्टेंबर रोजी अम्रिताने आत्महत्या केल्याचे योगेशने अम्रिताच्या परिवारला सांगितल्यावर सर्वांना धक्का बसला. योगेशने रविवारी दुपारी अम्रिताला एका खासगी रुग्णालयात आणले होते; मात्र डॉक्टरांनी रुग्णवाहिकेतच तिची तपासणी करून तिला मृत घोषित केले होते. माहेरच्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. प्रकरणाची चौकशी केल्यानंतर योगेश व त्याच्या कुटुंबीयांनी अम्रिताची गळा आवळून हत्या केल्याची तक्रार अलका काळमेघ यांनी सिव्हिल लाइन्स पोलिसात केली. यावरून पोलिसांनी अम्रिताचा पती योगेश वडतकर, सासरे मधुकरराव वडतकर, सासू सुशीला मधुकरराव वडतकर तसेच नणंद सुनीता कडू, मंजू मेघे, आशा बारब्दे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अम्रिताचा पती योगेश वडतकरला अटक केली. मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी योगेश वडतकरला २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपीस पोलीस कोठडी
By admin | Published: September 28, 2016 1:56 AM