अकोला - अकोला शहराची वाढलेली लोकसंख्या आणि त्याचबरोबर शहरातील गुन्हेगारीने गाठलेला कळस पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. शहरातील ही गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयाची नितांत आवश्यकता असल्याने अकोल्यातील पोलीस आयुक्तालय डिसेंबर २0१५ पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ग्रामिण राम शिंदे यांनी शुक्रवारी दिली. बाभूळगाव जहाँगीरनजीक त्यांच्या वाहनात बिघाड झाल्याने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याला दिलेल्या आकस्मिक भेटीत त्यांनी ही माहिती दिली. शहरात टोळी युद्धाचा वारंवार भडका होत असून, हत्या, चोर्या, लुटमार, घरफोड्यांसारख्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. खंडणीबहाद्दरांच्या हैदोसामुळे व्यापारी, उद्योजक, बिल्डर्स, डॉक्टर व शिकवणी वर्गाचे संचालक त्रस्त झाले आहेत. शहरातील गुन्हेगारी प्रचंड वाढलेली असताना त्यांना रोखण्यासाठी असलेली पोलिसांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे गुन्हेगारी पोलीस यंत्रणेवर भारी पडत असल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केवळ पोलीस आयुक्तालयच पर्याय आहे. अकोल्यासाठी पोलीस आयुक्तालयाला मंजुरी मिळाली असून, आयुक्तांसह पोलीस आयुक्तालयाला हवे असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा एक प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पोलीस आयुक्तालयासाठी जागेचा प्रश्न, या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २0१५ मध्ये अकोल्यातील पोलीस आयुक्तालय कार्यान्वित होणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली. यासोबतच अवैध दारू भट्टय़ांवर कारवाईचा धडाका सुरूच राहणार असून, राज्यातील या दारू भट्टय़ा उद्ध्वस्त करण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आल्याची माहितीही शिंदे यांनी दिली. अकोला जिल्हय़ातील पोलिसांच्या निवासस्थानांसाठी आलेला ५ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांच्या हलगर्जीमुळे अखर्चित राहिला असून, या अधिकार्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राम शिंदे यांनी स्पष्ट केले.
*वाहनात बिघाड; गृहराज्यमंत्री अकोल्यात
गृहराज्यमंत्री ग्रामीण राम शिंदे एका कार्यक्रमासाठी अमरावती येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून अमरावतीवरून औरंगाबादला जात असताना त्यांचे वाहन बाभूळगाव जहाँगीरनजीक पंक्चर झाले. त्यामुळे त्यांनी अकोला जिल्हाधिकार्यांना माहिती दिली. जिल्हाधिकार्यांनी तत्काळ दुसर्या वाहनाची व्यवस्था केल्यानंतर राम शिंदे यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात ५ मिनिटांची आकस्मिक भेट दिली. राम शिंदे पत्रकारांशी चर्चा करीत असतानाच ५ मिनिटात त्यांचे वाहन अकोल्यात दाखल झाले. त्यानंतर शिंदे तत्काळ औरंगाबादकडे रवाना झाले. यावेळी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.