सचिन राऊत - अकोलासर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर असलेले वाईन बार, वाईन शॉप बंद करण्यात आले आहेत. यामध्ये ८० टक्के वाईन बार आणि दुकाने बंद झाल्याने दारूची अवैध वाहतूक आणि विक्रीला उधाण आले असतानाच अशा विक्री आणि वाहतुकीला रोखण्यासाठी पोलिसांकडून ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ राबविण्यात येत आहे. दारूची अवैध विक्री करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी गृहमंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.जिल्ह्यात २५१ परवानाधारक वाईन बार आणि वाईन शॉप होते; मात्र यामधील २२२ वाईन बार आणि वाईन शॉप हे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतराच्या आतमध्ये असल्याने सदर वाईन बार आणि वाईन शॉप एक एप्रिलनंतर बंद करण्यात आले आहेत. २५२ मधील केवळ २९ वाईन बार आणि वाईन शॉप जिल्ह्यात सुरू आहेत. हीच गत राज्यातील बहुतांश शहरातील असल्याने देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांनी संधीचे सोने केले होते; मात्र हा प्रकार गृहमंत्रालयाच्या निदर्शनास येताच, राज्यात देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी तातडीने हालचाली करीत ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ राबविण्यास प्रारंभ केला आहे. आॅपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गतच जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू लावला आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत.जिल्हाभर मोहीमआॅपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत जिल्हाभर मोहीम राबविण्यात येत आहे. दारूची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये गवळीपुऱ्यात छापा मारून तब्बल १५ दिवस पुरेल एवढा दारू बनविण्याचा कच्चा माल नालीमध्ये टाकण्यात आला होता. ही मोहीम आता जिल्हाभर सुरू करण्यात आली आहे.खदान पोलिसांचे सात ठिकाणी छापेआॅपरेशन क्रॅक डाऊन सुरू होताच खदान पोलिसांनी त्यांच्या हद्दीत अवैध देशी आणि विदेशी दारू विक्रेत्यांवर छापेमारी केली. सात ठिकाणांवर छापा मारून खदान पोलिसांनी सात केसेस केलेल्या आहेत. या सात प्रकरणात २५१ क्वॉर्टर जप्त करण्यात आले असून, पाच लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. एक दुचाकीही खदान पोलिसांनी जप्त केली असून, सुमारे ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांचे ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’
By admin | Published: April 10, 2017 12:54 AM