अकोला: भूखंड व शेतीच्या प्रकरणांमध्ये अनेकांची फसवणूक करणाऱ्या उमेश राठी याने शहाबुद्दीन अलीमोद्दीन शेख याच्या मदतीने १00 रुपयांच्या चार मुद्रांकांचा गैरवापर करून व खाडाखोड करून उद्योजक विवेक पारसकर यांची फसवणूक केल्या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी शहाबुद्दीन शेख याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.रणपिसे नगरात राहणारा उमेश कन्हैयालाल राठी याने मुद्रांक विक्रेता शहाबुद्दीन शेख याच्या मदतीने २ जुलै २0१५ रोजी विवेक पारसकर यांच्या नावाने काही मुद्रांक घेतले. या मुद्रांकांचा गैरवापर व खाडाखोड करून त्याने बनावट करारनामा, इसारपावती बनवून उमेश राठीचा नातेवाईक मनोज बियाणी याच्यासोबत पारसकर यांनी भुसावळमधील प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचे भासवून इसारापोटी ९0 लाख रुपये पारसकर यांना दिल्याचे दर्शविले. त्यानुसार पारसकर याच्याविरुद्ध भुसावळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला; परंतु तपासात पारसकर यांचा प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विवेक पारसकर यांनी कोतवाली पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी उमेश राठी व शहाबुद्दीन शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शहाबुद्दीनला अटक केली असून, उमेश राठी हा फरार आहे. (प्रतिनिधी)