अकोला : ‘स्टेरॉइडच्या इंजेक्शन’ची अवैधरीत्या खुलेआम विक्री करणाऱ्या सिव्हिल लाइन रोडवरील सनी हेल्थ सेंटर आणि या हेल्थ सेंटरच्या संचालकाच्या खोलेश्वर येथील निवासस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री छापेमारी केल्यानंतर अटक केलेल्या तीनही आरोपींना सिटी कोतवाली पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. त्यानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती आहे.खोलेश्वर येथील रहिवासी सचिन ओमप्रकाश शर्मा याच्या मालकीचे सिव्हिल लाइन रोडवरील सनी हेल्थ एंटरप्रायजेस आणि खोलेश्वर येथील निवासस्थानावरून जीममध्ये जाणाºया युवक व महिलांना बॉडी बनविण्यासाठी स्टेरॉइडचे इंजेक्शन विनापरवानगी तसेच अवैधरीत्या आणि खुलेआम विक्री करीत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांना मिळाली होती. त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शनिवारी रात्री सनी हेल्थ सेंटर व त्याच्या निवासस्थानी एकाच वेळी छापेमारी केली. या छापेमारीत दोन्ही ठिकाणांवरून १ लाख ८५ हजार रुपयांचा स्टेरॉइड इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर या ठिकाणावरून सचिन ओमप्रकाश शर्मा रा. खोलेश्वर, विनायक मनोज सुळे रा. हरिहरपेठ व स्वप्निल कैलास गाडेकर रा. तुकाराम चौक या तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अन्न व औषध सौंदर्यप्रसाधन कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी तीनही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यासोबतच आरोग्यास घातक असलेले काही औषधे व प्रोटिन जप्त करण्यात आले आहेत. जबरी चोरीतील आरोपीया तीन आरोपीपैंकी एक आरोपी हा जबरी चोरीचाही आरोपी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या तीनमधील एका आरोपीविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातच जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. त्यामुळे गुन्हेगारी पृष्ठभूमीतूनच या आरोपींनी स्टेरॉइड इंजेक्शनचा गोरखधंदा सुरू केल्याची माहिती आहे.