लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नायगावातील संजय नगरातील एक पाच वर्षीय चिमुकली शुक्रवारी सायंकाळी बेपत्ता झाल्यानंतर अकोट फैल ठाण्यात आलेल्या तिच्या आई-वडिलांना मुलीला शोधण्याचा सल्ला देऊन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे. अकोट फैल पोलीस ठाण्यात दुसर्यांदा हा प्रकार घडल्याने पोलिसांची दिरंगाईच चिमुकलीच्या जीवावर उठल्याची चर्चा संपूर्ण पोलीस वतरुळात सुरू आहे. कुठलीही १८ वर्षाखालील मुलगी-मुलगा बेपत्ता झाल्यास बेपत्ता झाल्याची तक्रार न घेता तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून एक पथक गठित करावे आणि तातडीने अ पहरण झालेल्या अल्पवयीन मुलगा-मुलीचा शोध घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे आहेत; मात्र असे असतानाही आलिया परवीन ही चिमुकली शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाली. तिचे अशिक्षित आई-वडील तक्रार देण्यास आले; मात्र अकोट फैल पोलिसांनी त्यांनाच मुलीला शोधण्याचा सल्ला देऊन प्रकरणात टोलवा-टोलवी केल्याचा आरोप मुलीच्या िपत्याने केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने शोध घेतला असता तर मुलीचे प्राण वाचले असते, असेही समोर येत आहे. या हत्याकांडाला आता चार दिवस उलटले व पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन दिवस उलटले; मात्र त्यानंतरही अकोट फैल पोलीस अंधारात तीर मारत आहेत. गरीब व अशिक्षित असलेल्या तिच्या आई-वडिलांना पोलिसांनी तातडीने सहकार्य केले असते तर परिस्थिती वेगळी असती, अशी अपेक्षा तिच्या आई-वडिलांनी केली आहे; मात्र पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याने मुलीची अशा प्रकारे निर्मम हत्या झाल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
पोलिसिंग एवढी सुस्त का?या चिमुकलीच्या हत्याकांडासोबतच चोर्यांचे सत्र, दरोडे व खंडणीखोरांचा हैदोस जोरात सुरू आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी निर्माण केलेला पोलिसांचा दरारा त्यांची बदली होताच गुंड व चोरट्यांनी पायदळी तुडविला आहे; मात्र त्यानंतरही पोलीस यंत्रणा एवढी सुस्त का, असा सवाल सामान्य व्यक्तींकडून करण्यात येत आहे. पाच वर्षीय चिमुकलीचा मृतदेह बघून हजारोंची मने हेलावली. पोलिसांकडूनही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला; मात्र तिचे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत.अकोला पोलिसांच्या इतिहासात हुक्का पार्लरचा पर्दाफाश पहिल्यांदा झाला. यावरून अवैध धंदे कशा प्रकारे वाढले, हे दिसून येते. ज्या परिसरात चिमुकलीचे हत्याकांड घडले, त्याच परिसरात मोठे धंदेही सुरू असल्याचे वृत्त आहे.