अकोला : बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या कान्हेरी सरप येथील एका व्यक्तीस दारू विक्री करू देण्यासाठी तसेच एमपीडीए कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध अकोलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केला.
कान्हेरी सरप येथील ३० वर्षीय तक्रारदार यांना दारू विक्री करू देण्यासाठी तसेच एमपीडीए कारवाई टाळण्यासाठी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी अरुण गावंडे याने लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड होऊन दोन हजार रुपये लाच देण्याचे कबूल झाले, मात्र तक्रारदाराची लाच देण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२ ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता दारूचा धंदा सुरू करण्यासाठी तसेच एमपीडीएची कारवाई टाळण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यावरून आरोपी लोकसेवक अरुण गावंडे यांच्याविरुद्ध बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शरद मेमाने, सुनील येलोने, राहुल इंगळे यांनी केली.