अकोला, दि. १५-अकोट फैल परिसरात किरकोळ वादातून पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी १५ ते २0 जणांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.गस्तीवर असलेल्या अकोट फैल पोलिसांनी रात्री दुकाने बंद करण्यास बजावल्यानंतर हातगाड्या काढण्याची धावाधाव सुरू झाली. यादरम्यान एका हातगाडी चालकाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता हातगाडी चालकाने पोलिसांसोबत हुज्जत घालत दमदाटी गेली. त्यानंतर हातगाडी चालकाने २५ ते ३0 लोकांचा जमाव एकत्र करून पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांनी दुकाने तातडीने बंद करून काढता पाय घेतला. त्यामुळे परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. परिसरातील तणावाची परिस्थिती पाहता, अकोट फैल पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला. सदर प्रकरणात आरोपींची धरपकड रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनास्थळाला पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीना, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजयकांत सागर, एसडीपीओ उमेश माने पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
अकोट फैल परिसरात पोलिसांवर दगडफेक
By admin | Published: March 16, 2017 12:54 AM