अकोला, दि. २२- नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील करंजी पोलीस मदत केंद्रासमोर भरधाव ट्रकने क र्तव्यावरील पोलीस शिपायास चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास घडली. अण्णा ऊर्फ अरविंद बाबाराव चौधरी (३१) असे मृताचे नाव आहे. ते करंजी महामार्ग पोलीस मदत केंद्रात वाहतूक शिपायी म्हणून कार्यरत होते. ते मुळचे अकोल्यातील रहिवासी होते. अरविंद चौधरी हे प्रात:विधीसाठी रस्ता ओलांडून मंगी फाट्याकडे जाताना नागपूरकडून येणार्या के.ए.0१- ए.ई.२१७७ क्रमांकाच्या ट्रकने त्याला चिरडले. त्यात ते जागीच ठार झाले. घटनेनंतर चालक व वाहक ट्रक सोडून पसार झाले. अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अरविंद चौधरी चार महिन्यांपूर्वीच यवतमाळातील वडगाव रोड पोलीस ठाण्यातून येथे बदलून आले होते. मूळचा अकोला येथील रहिवासी असलेल्या अरविंदचा गेल्या एप्रिलमध्येच विवाह झाला होता. त्याच्या मागे वृध्द आई- वडील, पत्नी व बराच मोठा आप्त परिवार आहे.
पोलीस शिपायाला भरधाव ट्रकने चिरडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2016 2:17 AM