अकोला: शहरातील हरिहर पेठ भागात विशिष्ट समुदायातील युवकांनी दगडफेक व जाळपोळ केल्याची घटना घडत असताना घटनास्थळावर तब्बल एक ते दीड तासाच्या विलंबाने पोलिसांचा ताफा पोहोचला. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या निष्क्रियतेमुळेच जुने शहरात दंगलीचे लोन पसरल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याच्या गृहखात्यावर सडकून टीका केली.
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या पोस्टवरून जुने शहरातील हरिहरपेठ, गाडगे नगर, सोनटक्के प्लॉट आदी भागात १३ मे रोजी रात्री दंगल उसळली होती. यावेळी एका विशिष्ट समुदायाने या भागात नागरिकांच्या घरांवर दगडफेक करत घरासमोर उभे असलेल्या वाहनांना पेटवून दिले तसेच पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करीत पोलिसांवरही दगडफेक केली. यामध्ये अनेक नागरिक तसेच पोलीस कर्मचारी जखमी झाले. दगडफेकीत विलास गायकवाड नामक युवकाचा मृत्यू झाला. या घटनेचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे अकोल्यात दाखल झाले होते. सर्वप्रथम त्यांनी शहराचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिराची पाहणी करून दंगलग्रस्त भागातील नागरिकांसोबत संवाद साधला. तसेच मृतक विलास गायकवाड यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. दरम्यान, त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस प्रशासन तसेच अप्रत्यक्षपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
दंगल उसळल्यानंतर घटनास्थळावर पोलिसांचा ताफा विलंबाने का पोहोचला, याची खातरजमा करण्यासाठी सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे दानवे यांनी सांगितले. काही तरुण हातात दगड, लोखंडी पाईप तसेच इंधनाने भरलेल्या कॅन घेऊन दुचाकीवरून अकोट फाईल पोलीस स्टेशन, रामदासपेठ पोलीस स्टेशन, सिटी कोतवाली पोलीस स्टेशन तसेच जुने शहर पोलीस स्टेशन अशा तब्बल चार पोलीस ठाण्यांची हद्द ओलांडून जुने शहरातील हरिहर पेठ भागात शिरतात कसे, दगडफेक होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेतात कसे, असे नानाविध प्रश्न उपस्थित करून दानवे यांनी ही दंगल घडविण्यामागे ज्या मास्टरमाइंडचा हात आहे, त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे सांगितले. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार दाळू गुरुजी, माजी आमदार संजय गावंडे, जिल्हा संघटिका माया म्हैसने, उमेश जाधव, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने, उपशहर प्रमुख राजदीप टोहरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी तथा माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
दीड महिन्यात आठ दंगली; गृहमंत्री अपयशीमागील दीड महिन्याच्या कालावधीत राज्यातील विविध शहरांमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल आठ दंगली उसळल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर येथे जातीय दंगल उसळली होती. त्यानंतर विविध भागात दोन समाजात दंगली उसळल्याचे दिसून आले आहे. यावरून राज्याच्या गृह खात्याचा कारभार अत्यंत ढिसाळ असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपयश आल्याची टीका दानवे यांनी केली. राजकीय स्वार्थापायी दंगली घडवल्या जात आहेत का? याचाही शोध घेण्याची गरज असल्याचे दानवे यांनी सांगितले.