लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महसूल कॉलनीतील रहिवासी पोलीस निरीक्षक कुटुंबीय व सहायक पोलीस निरीक्षकांमध्ये घराच्या बांधकामावरून मंगळवारी आणि बुधवारी वाद झाला. वाद वाढल्याने दोघांनीही सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारींवरून पोलिसांनी पोलीस निरीक्षक विजय पाटकर व दोघांविरुद्ध अॅट्रासिटी अॅक्टनुसार, तर सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश वानखडे व इतर सहा जणांविरुद्ध विनयभंगाचे गुन्हे दाखल केले आहेत.महसूल कॉलनीतील सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश गोटीराम वानखडे (६४) व त्यांच्या शेजारीच सध्या वाशिम येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विजय पाटकर राहतात. विजय पाटकर यांच्या पत्नी वर्षा पाटकर यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रमेश वानखडे, रत्ना वानखडे , शुभांगी वानखडे व इतर चार आरोपींनी पाटकर यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करीत साहित्याची नासधूस केली. सोबतच त्यांच्या घरातील महिलांचा विनयभंग केला. त्यानंतर पर्समधील ३० हजार रुपये हिसकल्याचे नमूद केले.यावरून पोलिसांनी रमेश वानखडे, रत्ना वानखडे , शुभांगी वानखडे व इतर चार आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४५२, ३५४ अ, ३२३, ५०४, ५०७, ५०६, ३३७ नुसार गुन्हे दाखल केले आहेत, तर रमेश वानखडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते बुद्धगया येथे गेले होते. परत आल्यानंतर त्यांचे शेजारी विजय पाटकर यांनी त्यांच्या भिंतीवर बांधकाम केल्याचे दिसून आले. त्यांनी हटकले असता दोघांमध्ये बांधकामावरून वाद झाला. त्यानंतर विजय पाटकर यांच्या कुटुंबीयांनी म्हणजेच वर्षा विजय पाटकर, अर्पिता पाटकर यांनी वाद घालून रमेश वानखडे यांना जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले व रमेश वानखडे यांच्या पत्नीचे २५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जबरीने तोडून हिसकावले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी विजय पाटकर, वर्षा विजय पाटकर, अर्पिता पाटकर यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच भादंवि ३९२, २९४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक-‘एएसआय’मध्ये जुंपली
By admin | Published: June 08, 2017 1:36 AM