अकोला: सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटांत वाद होऊन दगडफेक, जाळपोळीची घटना १३ मे रोजी रात्री घडली होती. त्यामुळे पोलिसांनी आता सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष केंद्रीत केले असून, शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत व्हॉटस्ॲप ग्रुप ॲडमिनला पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत.
सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह संदेशामुळे १३ मे रोजी वादंग निर्माण होऊन जुने शहरात शेकडो जमावाने दगडफेक, जाळपोळ करून शहरात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी दोन दिवस शहरातील इंटरनेट सेवा बंद केली होती. सोशल मीडियावर पुन्हा आक्षेपार्ह, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संदेशांचे, व्हिडीओचे आदान-प्रदान करण्यात येऊ नये, या दृष्टीकोनातून पोलिस प्रशासन खबरदारी घेत असून, व्हॉट्सॲप ग्रुपबाबत पोलिसांनी माहिती गोळा केली आहे. त्यामध्ये ग्रुप ॲडमिनला नोटीस बजावून आक्षेपार्ह संदेश, व्हिडीओ प्रसारित होणार नाहीत. याची काळजी घेण्याबाबत बजावण्यात आले आहे.
काय म्हटले आहे नोटीसमध्ये?
अकोला शहराची अतिसंवेदनशील शहर म्हणून असलेली ओळख पाहता, किरकोळ बाबींवरून धार्मिक, जातीय तेढ निर्माण होऊन दंगली झाल्याचा पूर्व इतिहास आहे. व्हॉट्सॲप चालविणाऱ्या ग्रुप ॲडमिन यांनी कोणीही कोणत्याही धर्म, जातीच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचेल, असे संदेश, व्हिडीओ प्रसारित करणार नाही आणि समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, या दृष्टीने ॲडमिन किंवा ग्रुपच्या सदस्यांनी खबरदारी घ्यावी, अशी सूचना नोटीसच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार सोशल मीडियाच्या आक्षेपार्ह माध्यमातून आक्षेपार्ह, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संदेश, व्हिडीओंचे आदान-प्रदान होणार नाही. या दृष्टीकोनातून ग्रुप ॲडमिन किंवा ग्रुपमधील सदस्यांनी खबरदारी घ्यावी. यासाठी १५० जणांना नोटीस बजावल्या आहेत. - भाऊराव घुगे, ठाणेदार सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन