लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी पेलणाऱ्या पोलिसांचे वैयक्तिक आयुष्य मात्र अत्यंत खडतर आहे. ‘ड्युटीचे तास’ ठरलेले आहेत; मात्र वरिष्ठांचा आदेश, तातडीचा बंदाेबस्त, खून, दराेडे यांसारख्या घटना घडल्यानंतर कधीही ‘ड्युटी’वर हजर व्हावे लागते. मिळत असलेल्या पगारात भागत नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा आहे. निवासस्थाने मोडकळीस आल्याने वास्तव्य धोक्याचे बनले आहे.
अकाेला शहरात निमवाडी, दक्षतानगर, रामदास पेठ, पाेलीस मुख्यालय, देवी पाेलीस लाइन या ठिकाणी ५० वर्षांपूर्वी निवासस्थान बांधण्यात आलेली आहेत. तर आता नव्याने ४०० घरांचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. ५० वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांची निर्मिती झाली. काही कर्मचाऱ्यांनी स्वत: खर्च करून डागडुजी केल्याने त्यांची घरे सुस्थितीत दिसून येतात; मात्र बहुतांश घरांची आजमितीस पडझड झालेली आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंब तर टिनपत्र्याच्या घरांमध्ये वास्तव्यास असल्याचे पाहावयास मिळत आहे.
निवासस्थान परिसरात घरांमधील आणि शौचालयांमधील पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांची व्यवस्था नसल्याने दुर्गंधी सुटली आहे. माकडांच्या उच्छादाने पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय त्रस्त आहेत. अनेक घरांमध्ये आजही पाण्याची व्यवस्था पोहोचलेली नाही. अशा प्रकारच्या अनेकविध प्रश्नांमुळे पोलीस कर्मचारी कुटुंबे मिळणाऱ्या थोड्याथोडक्या पगारातून मुलांचे शिक्षण व घरखर्च भागत नसल्याने स्वत:चे घर बांधणे तर शक्य नाहीच. शिवाय बाहेर भाड्याचे घर घेऊन वास्तव्य करणे जमत नाही, असे काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी बोलून दाखविले. (प्रतिनिधी)
..............
ड्युटी किती तासांची?
पोलिसांना तशी १२ तासांची ड्युटी आहे; मात्र त्यापेक्षा अधिक वेळ कर्तव्य बजवावे लागते.
..........
कुटुंबासाठी किती वेळ?
पोलिसांना १२ तासांच्या ड्युटीनंतरही घरी परतता येत नाही. त्यामुळे कुटुंबासाठी फार कमी वेळ मिळतो.
............
मुलांचे शिक्षण कसे?
अधिकांश पोलीस कर्मचाऱ्यांचे पाल्य १२ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पोलीस होण्याची मनीषा बाळगतात.
.............
स्वत:चे घर नाहीच
पोलीस कर्मचाऱ्यांना तुलनेने पगार कमी मिळतो. त्यातून स्वत:चे घर उभारणे त्यांना अशक्य आहे.
.............
पाेलिसांची ड्युटी ही कधीही असते. ते २४ तास कार्यरत असतात. त्यामुळे मनात कायम भीती हाेती. मात्र बरीच वर्षे साेबत राहिल्यानंतर आता भीती राहिली नाही. समाजासाठी, मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी पती कार्यरत आहे. ही गर्वाची बाब आहे. मात्र त्या तुलनेत मिळणारा माेबदला प्रचंड कमी आहे.
प्रमिला ढाेरे, अकाेला
-