स्थानिक भवानीपुरा स्थित रहिवासी गणेश सातव व सतीश महाजन या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून रविवारी वाद झाला. दरम्यान, याप्रकरणी सतीश महाजन याने पोलीस ठाण्यात गणेश सातव याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी अदखलपात्र नोंद करून गणेश सातव यास पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यामुळे वडील शिवाजी सातव हेसुद्धा पोलिस ठाण्यात हजर झाले. दरम्यान, एका पोलीस कर्मचाऱ्याने अदखलपात्र नोंद असताना गणेश सातव यास वडिलांसमक्ष थापड मारली. आयुष्यात कधीही पोलीस ठाण्याची पायरी न चढलेल्या शिवाजी सातव यांना पोलीस कर्मचाऱ्याने मुलाला थापड मारल्याने वाईट वाटले. शिवाजी सातव यांची प्रकृती अचानक पोलीस ठाण्यातच बिघडली. त्यांना उपचारासाठी अकोला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या मारहाणीचा धक्का वडिलांना बसला. यातच त्यांची प्रकृती बिघडली. रक्तदाब वाढला आणि त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी करीत, नातेवाईकांनी मृतदेह पोलिस ठाण्यात आणला. कारवाई होईपर्यंत मृतदेह जागेवरून हलविणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे ठाणेदार सुनील सोळंके यांनी नातेवाईकांची समजूत काढून सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. घटनेची फिर्याद गणेश सातव यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिली व पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली.
पोलीस कर्मचाऱ्याने केली मुलास मारहाण, वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:19 AM