बाळापूर (अकोला), दि. २४- राष्ट्रीय महामार्गावरील शेळद फाट्यानजीक २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अकोल्याहून बाळापूरला शासकीय डाक घेऊन येणार्या महिला पोलीस कर्मचार्याच्या स्कूटीला विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणार्या ट्रकने जोरदार घडक दिल्याने ३0 वर्षीय महिला पोलीस कर्मचारी जागीच ठार झाली. या अपघातात तिच्या स्कूटीवर मागे बसून प्रवास करणारी अन्य एक महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाली. ज्योती श्रीधर थोरात (३0) ही महिला पोलीस कर्मचारी शुक्रवारी सकाळी अकोला येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून एमएच ३0 एडी ३0१९ क्रमांकाच्या स्कूटीने सरकारी डाक सोबत घेऊन बाळापूरला येत होती. तिच्यासोबत प्रतिभा इंगळे ही महिला पोलीस स्कूटीवर मागे बसून प्रवास करीत होती. त्यांची स्कूटी शेळद फाट्यानजीक आली असताना, विरुद्ध दिशेने येणार्या जीजे १९ एक्स १८९0 क्रमांकाच्या ट्रकने स्कूटीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे स्कूटी चालवत असलेली महिला पोलीस कर्मचारी ज्योती थोरात ही रस्त्यावर फेकली जाऊन त्याच ट्रकच्या चाकाखाली आली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या स्कूटीवर बसलेली महिला पोलीस कर्मचारी प्रतिभा इंगळे जखमी झाली. या अपघाताबाबत जखमी प्रतिभा इंगळे यांनी बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली. त्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी भादंविच्या २७९, ३३७, ३0४ व मोटारवाहन कायदा १८४ नुसार संबंधित ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ट्रकच्या धडकेत महिला पोलीस ठार
By admin | Published: March 25, 2017 1:49 AM