अकोला : स्थानिक एमआयडीसीतील एका फूड या फॅक्टरीमध्ये गुजरात येथील मेकअप बॉक्सच्या उत्पादनाच्या नावे हुबेहूब पॅकिंग करीत उत्पादन व विक्री करीत असल्याची व्यापाऱ्याची तक्रार प्राप्त होताच शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी फूड फॅक्टरीमध्ये बुधवारी छापा टाकला.
गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी राजेशकुमार कनुभाई जाधव यांचा शिवानी मेकअप बॉक्स या नावाने व्यवसाय आहे. शिवानी मेकअप बॉक्स नावाने त्यांचा ट्रेडमार्कसुद्धा रीतसर रजिस्टर आहे. एका फूडचे संचालक हे त्यांच्याच ट्रेडमार्कचा दुरुपयोग करीत त्यांच्या पॅकिंगची हुबेहूब पॅकिंग बनवीत उत्पादन करीत असून कमी दराने बाजारात विक्री करीत असल्याची तक्रार गुजरातमधील व्यापाऱ्याने केली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी एमआयडीसी पोलिसांसमवेत फूडस फॅक्टरीत छापा मारीत मालाची पाहणी केली. तपासणीसाठी काही माल ताब्यात घेण्यात आला आहे. मालाची विल्हेवाट न लावण्याचा आदेशसुद्धा दिला आहे.