शहरासह जिल्ह्यात तेरा गजाआड, दोन लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्तअकोला : म्हैसांग येथील दारू अड्ड्यावरून देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी पाळत ठेवून छापा टाकला. यावेळी नऊ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये पाच दुचाकी, मोबाइल व दारूचा साठा याचा समावेश आहे.म्हैसांग ते दापुरा रोडवर म्हैसांग येथील एका दारू अड्ड्यावरून सरप येथील रहिवासी सुनील राजू सोनोने, राजू काशीनाथ सोनोने, पाळोदी येथील रहिवासी अनिल युवराज गोपनारायण, भामोद येथील रहिवासी विजय माणिकराव रायबोले, भीमराव भागूजी रायबोले, कट्यार येथील रहिवासी सज्जन निरंजन शिरसाट, सांगळूद येथील अशोक शंकर पवार, पळसो येथील राम बाबुलाल वानखडे, दापुरा येथील संगीता मिलिंद भगने हे नऊ जण देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी म्हैसांग ते दापुरा रोडवर पाळत ठेवून सदर नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर या नऊ जणांकडून पाच दुचाकी, मोबाइल, देशी व विदेशी दारूचा साठा असा एकूण दोन लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय शशिकिरण नावकार, नरेंद्र चऱ्हाटे, राजेश वानखडे, संदीप टाले व अजय नागरे यांनी केली.सिव्हिल लाइनमध्ये दोघे ताब्यातराष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या वाईन बार, वाईन शॉप आणि देशी-विदेशी दारूच्या दुकानांवर बंदी घातल्यानंतर, देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन सिव्हिल लाइन्स पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. त्यांच्याकडून २६ हजार ३० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनच्या हद्दीतून पंकज राजकुमार गुरु बानी आणि त्याचा साथीदार सतीश अशोककुमार साबडिया हे दोघे एलआरटी महाविद्यालयाच्या समोरून देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याची माहिती सिव्हिल लाइन्स पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी या दोघांवर पाळत ठेवून ते देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करीत असताना त्यांना एलआरटी महाविद्यालयासमोर पकडले. दोघांकडून २६ हजार ३० रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.खदान पोलिसांची दोघांवर कारवाईराष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या वाईन बार, वाईन शॉप आणि देशी-विदेशी दारूच्या दुकानांवर बंदी घालण्यात आल्यानंतर देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले असून, बुधवारी अशाच प्रकारे दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोघांवर खदान पोलिसांनी कारवाई केली. खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतून विकास अर्जुन टमटमकर आणि त्याचा साथीदार संतोष अक्कुसिंह ठाकूर हे दोघे देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. यावरून खदान पोलिसांनी या दोघांवर पाळत ठेवून, ते देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करीत असताना त्यांना खदान परिसरात पकडले. दोघांकडून २६ हजार ६८० रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.