फरार आरोपीचा शोध सुरू
अकोला : अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर पीडित कॉलनी येथे क्षुल्लक कारणावरून एका किरकोळ व्यावसायिकाची हत्या करणाऱ्या तीनपैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर फरार आरोपीचा अकोट फाइल पोलीस शोध घेत आहेत.
संत कबीरनगर येथील रहिवासी नरेश खुशाल मेगवाणे (वय ५२) व सोहम गौतम गायकवाड हे दोघे चांगले मित्र असून ते अकोट फाइल व रेल्वेस्टेशन परिसरात खरमुरे फुटाणे विक्रीचा किरकोळ व्यवसाय करीत होते. या दोघांमध्ये व्यवसायातील उधारीवरून वाद झाला. या वादातच सोहम गौतम गायकवाड (रा. पूर पीडित क्वॉर्टर), रोहित गायकवाड व राजकुमार या तिघांनी नरेश खुशाल मेगवाणे यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तीनही आरोपी गोदाम परिसरातून फरार झाले. श्वानपथकाच्या इशाऱ्यावरून पोलिसांनी तातडीने अकोट रोडवरील एका परिसरातून सोहम गौतम गायकवाड व रोहित गायकवाड या दोघांना ताब्यात घेतले. व्यवसायातील उधारीच्या कारणावरून हे हत्याकांड झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांसमोर केली. याप्रकरणी अकोट फाईल पोलिसांनी सोहम गायकवाड व रोहित गायकवाड आणि राजकुमार नामक युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना
नरेश मेगवाणे या किरकोळ व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार आहे. या आरोपीच्या शोधासाठी एक पथक रविवारी शेगाव येथे रवाना झाले होते. त्यांनी शेगावात या आरोपीचा शोध घेतला. मात्र, आरोपीचा पत्ता लागला नाही. अकोट फाइल पोलीस आरोपीच्या मागावर असून त्याला लवकरच बेड्या ठोकण्यात येणार असल्याची माहिती आहे.