राम नगरातील एका मेडिकल स्टोअर्समधून कोरोनावर उपायकारक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची खात्रीलायक माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून तसेच बनावट ग्राहकाद्वारे या गौरखधंद्यातील आरोपी आशिष समाधान मते याच्याकडून बिना देयक, प्रिस्क्रिप्शनशिवाय रेमडेसिविर हे इंजेक्शन तब्बल २५ हजार रुपयांमध्ये विक्री करीत असताना त्याला ताब्यात घेतले होते. त्याच्या माहितीवरून रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करणारे त्याचे साथीदार राहुल गजानन, बंड वय २६ वर्षे, राहणार भारती प्लॉट जुने शहर, सचिन हिंमत दामोदर, वय ३० वर्ष राहणार अशोक नगर अकोट फाइल, प्रतीक सुरेश शहा राहणार रामनगर व अजय राजेश आगरकर वय २५ वर्षे राहणार बाळापूर नाका यांचाही सहभाग असल्याचे समोर येताच पाचही आरोपींना अटक केली. या पाच आरोपींनी दिलेल्या माहितीवरून बिहाडे कोविड केअर सेंटर तथा हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफ असलेल्या सोनल फ्रान्सिस मुजमुले वय २७ वर्षे राहणार लहरिया नगर कौलखेड व भाग्येश प्रभाकर राऊत वय २९ वर्षे राहणार इंजिनिअरिंग कॉलनी मोठी उमरी या दोघांना सोमवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ७ आरोपींकडून तीन रेमडेसिविर इंजेक्शन तसेच एक लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोमवारी अटक केलेल्या दोन आरोपींना न्यायालयाने एक मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अनेक बडे डॉक्टरही काळ्या बाजारात गुंतलेले
स्थानिक गुन्हे शाखेने रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करून सुमारे २५ ते ३० हजार रुपयात त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ज्या मेडिकलमधून तसेच ज्या हॉस्पिटलमधील कोविड रुग्णांना इंजेक्शन देण्यात येत होते किंवा नव्हते याची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करणारी टोळीमध्ये काही डॉक्टरांचा सहभाग असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे मेडिकलचे संचालक व डॉक्टरांचीही चौकशी स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केली असून त्यांनाही लवकरच बेड्या ठोकण्यात येणार असल्याची माहिती आहे.