अकोला: पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक गोरख भांबरे यांच्या पथकाने एका वाहनातून तब्बल ९ लाख रुपयांचा गुटखा पकडल्यानंतर वाहन चालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोदामावर छापा टाकून तब्बल ३० ते ३५ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. ही कारवाई भांबरे यांचे पथक व एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तरीत्या सोमवारी रात्री २ वाजता केली.एमआयडीसीतील एका गोदामात मोठा गुटखा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर भांबरे यांचे पथक व एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी रात्री या गोदामावर छापा टाकला. त्यानंतर सदर गोदामातील तब्बल दोन ट्रक म्हणजेच ८० ते ९० पोते गुटखा साठा जप्त केला. त्यानंतर या कारवाईची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिल्यानंतर मंगळवारी दुपारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गुटखा साठ्याची मोजणी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत ही मोजणी सुरू असल्यामुळे हा गुटखा साठा अंदाजे ३० ते ३५ लाख रुपयांचा असल्याचे पोलीस व अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर गुटखा साठा हा भाड्याच्या गोदामात असल्याने त्याचा मालक शोधण्यात दोन्ही विभागाला अपयश आले होते. तत्पूर्वी पातूर पोलिसांच्या हद्दीत ९ लाख रुपयांचा गुटखा साठा आणि खदान पोलिसांच्या हद्दीत तब्बल २ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे ५० लाख रुपयांचा गुटखा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. त्यानंतर हा गुटखा साठा ठेवणाऱ्यांवर पातूर, एमआयडीसी तसेच खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा साठा अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ताब्यात घेतला असून, तो गोदामात ठेवण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त लोभसिंह राठोड यांनी दिली.पोलिसांच्या माहितीनंतर गुटखा साठा मोजणीचे काम करण्यात आले आहे. त्यानंतर हा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गोदामात ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात कुठेही गुटख्याची वाहतूक किंवा साठा असल्यास माहिती द्यावी.- लोभसिंह राठोड, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासनपोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करीत साठा जप्त केला आहे. यामधील गुटख्याचा मालकाचा शोध घेण्यात येत आहे. भाडेतत्त्वावरील गोदामातून हा साठा जप्त केला.- किशोर शेळकेठाणेदार, एमआयडीसी पोलीस स्टेशन