लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राजराजेश्वर कावड पालखी महोत्सव व पोळय़ानिमित्त पोलीस प्रशासनाद्वारे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात चार पोलीस उप अधीक्षक, पोलीस निरीक्षक व मोठा फौजफाटा तैनात राहणार आहे.अकोला शहर व तालुक्यात पोळा व राजराजेश्वराची पालखी कावड यात्रा मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येते. या उत्सवामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलीस प्रशासनाने खबरदारी घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये एक पोलीस अधीक्षक, एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, चार शहर पोलीस उप अधीक्षक, १२ पोलीस निरीक्षक, ४0 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, ५00 पुरुष पोलीस कर्मचारी, १00 महिला पोलीस कर्मचारी, ५00 पुरुष होमगार्ड, १00 महिला होमगार्ड, आरसीपीच्या चार प्लाटून म्हणजेच ८0 पोलीस कर्मचारी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची १५0 पोलिसांचा समावेश असलेली एक तुकडी आणि १00 पोलीस मित्र, असा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात किंवा जिल्हय़ात कुठेही अनुचित प्रकार होत असल्याचे दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले आहे.
कावड, पोळय़ासाठी पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 1:42 AM