लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात मोकाट डुकरांनी उच्छाद मांडला असून, डुकरांपासून जीवघेण्या ‘स्वाइन फ्लू’ आजाराची शक्यता बळावली आहे. शहरातील डुकरे पकडण्यासाठी मनपा प्रशासनाने आजपर्यंत तीन वेळा निविदा प्रकाशित केली. वराह पालकांच्या धास्तीमुळे कोणीही निविदा सादर केली नाही. अखेर यावर प्रभावी तोडगा म्हणून २० जणांची चमू तयार करण्यात आली असून, मनपा अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह पोलीस बंदोबस्तात डुकरे पकडण्याच्या मोहिमेला उद्यापासून (शनिवार) सुरुवात क रण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिले आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत उघड्यावर शौच करणाऱ्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना वैयक्तिक शौचालय बांधून देण्याची मोहीम मनपाने यशस्वीरीत्या पार पाडली. मनपा प्रशासनाकडून शहर हगणदरीमुक्त करण्याचे ठोस प्रयत्न होत असतानाच डुकरांच्या समस्येने त्यात भर घातली आहे. डुकरांच्या विष्ठेतून परिसरात दुर्गंधी व घातक जिवाणू पसरत असल्यामुळे अकोलेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागात ही समस्या असून, वराह पालकांप्रती असंतोष निर्माण झाला आहे. डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या अकोलेकरांच्या मागणीवर प्रशासनसुद्धा ठाम आहे. त्यामुळेच मोकाट डुकरे पकडण्यासाठी प्रशासनाने आजपर्यंत तीन वेळा निविदा प्रकाशित केल्या. वराह पालकांच्या धमकीवजा इशाऱ्यामुळे एकाही निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. मध्यंतरी उन्हाळ््यात शहरात जीवघेण्या ‘स्वाइन फ्लू’चे रुग्ण आढळून आले होते. यामध्ये डाबकी रोड परिसरातील पोलीस वसाहत, गंगानगर आदी भागात स्वाइन फ्लूमुळे रुग्णांचा मृत्यू झाला होता. डुकरांच्या माध्यमातून स्वाइन फ्लूचा फैलाव झपाट्याने होतो. पावसाचे दिवस लक्षात घेता व संभाव्य आजाराला आळा घालण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मोकाट डुकरांना पकडण्याचे महापौर विजय अग्रवाल यांचे प्रशासनाला निर्देश आहेत. त्यानुषंगाने प्रशासनाने डुकरे पकडण्यासाठी २० जणांची चमू तयार केली असून, उद्यापासून डुकरे पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे. एका डुकराचे ५० रुपये देणार!२० जणांची चमू डुकरांना पकडून त्यांची शहराबाहेर विल्हेवाट लावणार. त्यासाठी प्रति डुकराचे ५० रुपये अदा केले जातील. एका दिवसात किमान २०० डुकरे पकडण्याची कंत्राटदाराला खात्री आहे. अन् सभागृहात सोडले होते डुकराचे पिल्लू!मोकाट डुकरांमुळे हैराण झालेले प्रभाग १२ चे नगरसेवक अजय शर्मा यांनी २८ जून रोजी मनपाच्या सभागृहात चक्क डुकराचे पिल्लू सोडले होते. या आंदोलनामुळे शहरात डुकरांपासून अकोलेकर वैतागल्याचे चित्र समोर आले होते.मोकाट डुकरांना पकडून त्यांची शहराबाहेर विल्हेवाट लावण्याची स्पष्ट सूचना दिली आहे. यानंतर शहरात वराह पालनाचा व्यवसाय गैरकायदेशीर ठरणार आहे. प्रभाग ५ मध्ये डुकरे पकडण्यास प्रारंभ होईल. त्याला आडकाठी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.-विजय अग्रवाल, महापौरवराह पालनाचा व्यवसाय करणारे मनपाच्या आस्थापनेवर कार्यरत आहेत. त्यांची यादी तयार झाली असून, मोहिमेला आडकाठी निर्माण करणाऱ्यांना मनपाच्या सेवेतून थेट घरचा रस्ता दाखविण्यात येईल. -अजय लहाने, आयुक्त मनपा
मोकाट डुकरे पकडण्यासाठी आता पोलीस बंदोबस्त
By admin | Published: July 08, 2017 2:00 AM