लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पोलीस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद निर्माण होऊन समन्वय राखल्या जावा, यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून ‘पोलीस आपल्या शिवारात’ अभियानास खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चांदूर येथून सोमवारी प्रारंभ करण्यात आला. १७ ते २३ जुलैदरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यांमधील अधिकारी व कर्मचारी गावांमध्ये जाऊन नागरिक, शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या, सण, उत्सव आणि गावातील परिस्थितीची माहिती घेणार आहेत.नुकतेच संपलेले शेतकरी आंदोलन, पावसाची अनियमितता, येणारा पोळा उत्सव या पृष्ठभूमीवर पोलीस आणि ग्रामीण भागातील नागरिक विशेषत: शेतकरी यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी आणि समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘पोलीस आपल्या शिवारात’ हे अभियान राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. अभियानादरम्यान नियोजित वेळापत्रकानुसार पोलीस ठाण्याचे ठाणेदार, पोलीस अधिकारी, कर्मचारी, अंमलदार हे हद्दीतील गावांना भेटी देऊन तेथील नागरिक, शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्यांसह सण, उत्सव आणि गावातील जातीय परिस्थिती, गतकाळात घडलेल्या घटना याबाबत माहिती जाणून घेणार आहेत. नागरिक व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पोलिसांची प्रतिमा उंचाविण्यासाठी आणि पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण व्हावी, ही या अभियानामागील भावना असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी स्पष्ट केले आहे. या अभियानाचा प्रारंभ खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम चांदुर येथून करण्यात आला. या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी उपस्थित राहून नागरिकांसोबत संवाद साधला. त्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांनी मार्गदर्शन केले. यासोबतच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस आपल्या शिवारात, हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, तंटामुक्त ग्राम समिती, शाळा मुख्याध्यापक, कृषी सहायक, राजकीय नेते यांचीसुद्धा मदत घेण्यात येणार आहे.
‘पोलीस आपल्या शिवारात’ अभियानास प्रारंभ
By admin | Published: July 17, 2017 6:54 PM