अकोला : कोरोना या संसर्गजन्य विषाणूला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केल्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे; मात्र जीवनावश्यक सेवांवर पोलिसांच्या बंदोबस्ताचा परिणाम होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी बुधवारी दुपारी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.कोरोना संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी जाहीर केल्यानंतर जिल्ह्यांच्या सीमाही बंद केलेल्या आहेत; मात्र जीवनावश्यक वस्तूंची सेवा पुरविणारी दुकाने सुरूच ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. विनाकारण बाहेर निघणाºयांना पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखविण्याच्या सूचना खुद्द गृहमंत्र्यांनी केलेल्या आहेत; मात्र तरीही काही जण औषधांची जुनी चिठ्ठी, किराणा यांसह विविध कारण समोर करून बाहेर येत आहेत. अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान अकोला पोलिसांसमोर असल्याने पोलीस अधीक्षक गावकर यांनी शहरातील ठाणेदारांसह, शहर पोलीस उपअधीक्षक यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन अकोलेकरांना केले आहे. संयम ठेवा, स्वत:च्या तसेच प्रत्येक भारतीय नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आपण घरातच राहून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी केले आहे. साठेबाजांचा घेणार शोधजीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून त्याची चढ्या दराने विक्री करणाºयांचा शोध घेण्याच्या सूचनाही पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी केल्या आहेत. साठेबाजी करणारे तसेच चढ्या दराने विक्री करणाºयांवर आता पोलीस प्रशासनाचा वॉच राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेत जागतिक संकटात तरी काळाबाजार करू नये, असेही गावकर यांनी स्पष्ट केले.