अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कैलास टेकडी येथील दोन मुली घरातील व्यक्तींसोबत पटत नसल्यामुळे रविवारी रागाने निघून गेल्या होत्या. त्यानंतर खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली आणि मोबाइल लोकेशनवरून दोन्ही मुलींचा सहा तासांतच शोध घेतला. या दोघींना पिंजर परिसरातून ताब्यात घेतले असून, त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.कैलास टेकडी येथे एका विशिष्ट समाजाचे कुटुंब वास्तव्यास आहे; मात्र घरातील व्यक्तींसोबत दोन्ही मुलींचे पटत नसल्यामुळे त्या रविवारी घरातून रागाने निघून गेल्या होत्या. दोघी बहिणींपैकी एक बहीण १७ वर्षांची तर दुसरी २२ वर्षांची असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या दोघी मुली अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी खदान पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दोन्ही मुलींकडे असलेल्या मोबाइल लोकेशनवरून त्यांना ट्रेस करण्यात आले. त्यांचे लोकेशन पिंजर येथे आढळून आले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी ताफ्यासह पिंजर गाठले आणि दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन खदान पोलीस ठाण्यामध्ये आणले. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना खदान पोलीस ठाण्यामध्ये बोलाविण्यात आले; मात्र दोन्ही मुलींनी घरी जाण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.