लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रमजान ईदच्या पृष्ठभूमीवर शहरातील जातीय सलोखा आणि शांतता कायम राहावी, या दृष्टिकोनातून पोलीस दलातर्फे शहरात शुक्रवारी सायंकाळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. पथसंचलनामध्ये जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर सहभागी झाले होते. पोलीस संचलनाची सुरुवात ताजनापेठ पोलीस चौकी परिसरातून करण्यात आली. शहरातील ताजनापेठ, सुभाष चौक, अकोट स्टँड, माळीपुरा, लक्कडगंज परिसर, जुने शहरातील काही भागातून पोलिसांनी पथसंचलन केले. यात शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे ठाणेदार, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते. २६ जून रोजी रमजान ईद सण असल्याने, मुस्लीम बांधव मोठय़ा संख्येने नमाज पठण करतात. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात रमजान ईद साजरी करण्यात येते. ईदच्या पृष्ठभूमीवर शहरात शांतता नांदावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस दलाच्यावतीने दरवर्षी शहरातील प्रमुख भागातून पथसंचलन करण्यात येते. पथसंचलनामध्ये राखीव पोलीस दलाचे जवानसुद्धा सहभागी झाले होते.पथसंचलनामध्ये शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्यासह ठाणेदार अन्वर शेख, गजानन शेळके, अनिल जुमळे, रामदासपेठचे शैलेश सपकाळ, अकोट फैलचे तिरुपती राणे, एमआयडीसीचे ठाणेदार किशोर शेळके, जुने शहरचे भाऊराव घुगे आदी सहभागी झाले होते.
ईदच्या पृष्ठभूमीवर पोलिसांचे पथसंचलन
By admin | Published: June 24, 2017 5:48 AM