सचिन राऊत
अकोला : कामाच्या ठिकाणी तसेच कामावरून घरी जाताना किंवा घरून कामावर जाताना रस्त्यात महिला, युवतींचा शारीरिक छळ तसेच अश्लील शेरेबाजी रोखण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत अकोला पोलिसांनी बडी कॉप योजना जोरात सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर दोन ते तीन पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून नोकरी तसेच इतर कोणतेही काम करणाऱ्या महिलांना सुरक्षा प्रदान करण्यात येत आहेत.
राज्यभर शासकीय तसेच खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला व युवतींचा लैंगिक छळ झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या ठिकाणांसोबतच त्या महिला घरी जाताना किंवा घरून कामावर येताना रस्त्यामध्ये त्यांचा छळ झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत बडी कॉप ही योजना कार्यान्वित करून अशा महिलांना सुरक्षा प्रदान करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले होते. त्यावरून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात बडी कॉप योजना कार्यान्वित करण्यात आली आहे; मात्र काही जिल्ह्यात अद्यापही या योजनेचे कामकाज सुरू झाले नसल्याची माहिती आहे. अकोला जिल्ह्यात योजनेसाठी प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील या सर्व बाबींवर वाॅच ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षात एका अधिकाऱ्याला विशेष पदभार देण्यात आलेला आहे.
पोलीस महासंचालकांची संकल्पना
राज्यात शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये व इतर ठिकाणांवर काम करणाऱ्या महिला व मुलींचा छळ होत असल्याच्या असंख्य तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून बडी कॉप योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
बहुतांश जिल्ह्यात अंमलबजावणी नाही
कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ रोखण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत बडी कॉप योजना राबविण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांनी दिल्यानंतरही बहुतांश जिल्ह्यात ही योजना कार्यान्वित नसल्याची माहिती आहे.
महिलांना तत्काळ मदत
अकोला पोलिसांनी बडी कॉप ही योजना कार्यान्वित केली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून महिला व युवतींशी संपर्क ठेवण्यात येत आहे. त्यांना कोणतीही अडचण आल्यास संबंधित कर्मचारी त्यांची अडचण तातडीने सोडविण्यास प्राधान्य देत आहे.
२५ पेक्षा जास्त व्हाॅट्सअप ग्रुप
संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या महिला खासगी, शासकीय नोकरी किंवा इतर कोणतेही काम करीत असेल तर त्यांचा मोबाईल क्रमांक घेऊन अशा महिलांचा व्हाॅट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. या ग्रुपचे ॲडमिन संबंधित पोलीस कर्मचारी आहेत. महिलांना केव्हाही असुरक्षित भावना वाटली तर त्या तातडीने ग्रुपवर मेसेज टाकतात आणि संबंधित कर्मचारी त्यांना तत्काळ प्रतिसाद देऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी जिल्हाभर २५ पेक्षा अधिक व्हाॅट्सअप ग्रुप तयार केल्याची माहिती आहे.
अकोला जिल्ह्यात बडी कॉप योजना सुरू करण्यात आलेली आहे; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या योजनेचे विशेष प्रोग्राम घेण्यात आलेले नाहीत; मात्र आता नव्याने या योजनेचे कामकाज सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.
जी. श्रीधर
पोलीस अधीक्षक अकोला
बडी कॉप योजना म्हणजे महिलांना सुरक्षा प्रदान करणारे पोलीस
जिल्ह्यात बडी कॉप - ४९
महिलांसाठी व्हाॅट्सॲप ग्रुप -५०
जिल्ह्यात काम करणाऱ्या महिला - १३,००० सुमारे
लैंगिक छळाच्या तक्रारी - ३९६