सचिन राऊत अकोला, दि. २६- अकोला जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांच्या संख्येच्या तुलनेत तब्बल १ हजार ५00 पोलीस निवासस्थाने कमी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे आता पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या प्रयत्नाने जिल्हय़ात लवकरच ३५0 पोलीस निवासस्थानांच्या बांधकामाचा लवकरच श्रीगणेशा होणार आहे. पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या आकडेवारीनुसार राज्यात २ लाख २0 हजार पोलीस कार्यरत आहेत. मात्र, या तुलनेत पोलिसांची निवासस्थाने केवळ ८0 हजार आहेत. राज्यातील पोलिसांसाठी येणार्या तीन वर्षात एक लाख निवासस्थाने बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून, यामधील अकोल्यातील पोलिसांसाठी तब्बल ३५0 घरे बांधण्यात येणार आहेत. इंग्रजकालीन तसेच शिवकालीन घोड्यांचे तबेले पोलिसांना निवासस्थानासाठी देण्यात आले असून, आजही या ठिकाणांवर पोलीस राहत आहेत. २४ तास कर्तव्यदक्ष असलेल्या पोलिसांना राहण्याची योग्य सुविधा नसल्याचे वास्तव असल्याने पोलिसांसाठी राज्यात एक लाख घर बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून, यामधील ३५0 पोलीस निवासस्थाने अकोल्यात बांधण्यात येणार आहेत. हे निवासस्थाने बांधकाम येत्या आठ दिवसांमध्ये सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांच्या निवासस्थानांसाठी हुडकोकडून कर्ज घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.पोलिसांच्या निवासस्थानांसाठी चार 'एफएसआय'मुंबई, पुणे आणि मोठय़ा शहरातील पोलिसांच्या निवासस्थानांसाठी चार एफएसआय मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र कायदा केल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. त्यामुळे मोठय़ा शहरातील पोलिसांनाही लवकरच हक्काची निवासस्थाने मिळणार असून, अकोल्यातील पोलिसांनाही निवासस्थान मिळणार आहेत.
पोलिसांच्या १ हजार ५00 निवासस्थानांची कमतरता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2017 2:50 AM