अकोला: बहुसंख्य कमकुवत घटकांना भरपूर प्रथिने असलेली अन्नधान्य मिळावेत, या दृष्टीने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने लक्ष केंद्रित केले असून, देशातील पर्जन्यश्रीत भागात राहणाऱ्या छोट्या आणि सीमांत शेतकºयांच्या गरजा लक्षात घेऊन २०१८ हे राष्ट्रीय पौष्टिक अन्नधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे.तृणधान्य पिकांना त्यातील विशेष पोषक मूल्यामुळे केंद्र शासनाने पौष्टिक अन्नधान्य म्हणून राजपत्राद्वारे अधिसूचित केले आहे. ही पौष्टिक अन्नधान्ये, विशेषत: बहुसंख्य कमकुवत लोकांना, लहान मुलांना, स्त्रियांना, गरीब शेतकरी वर्गातील लोकांना पोषण देतात. या पोषक अन्नधान्यात प्रथिने, तंतूमय पदार्थ आणि खनिज मूलद्रव्ये भरपूर प्रमाणात असल्याने आरोग्याच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. या पौष्टिक अन्नधान्य पिकात हवामानाला सामोरे जाण्याचा गुणधर्म असल्याने विपरीत परिस्थिती जसे कमी पर्जन्यमानात, कमी निविष्ठा परिस्थितीतही वाजवी उत्पादन मिळू शकते. पोषक अन्नधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१८ पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत एक वेगळे उप-अभियान सुरू केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेद्वारे २०१८ हे मिलेट वर्ष म्हणून घोषित करण्याचा केंद्र शासन प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे पोषक धान्याचा पुरवठा केला जात असून, शेतकºयांना योग्य मूल्य मिळण्याच्या दृष्टीने या पिकांच्या किमान आधारभूत किमतीतही केंद्र शासनाने लक्षणीय वाढ केली आहे. याबाबत पुण्यात २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावरील पौष्टिक अन्नधान्य कार्यशाळा घेण्यात आली.यासंदर्भात राज्यात अभियान राबविण्यात येणार आहे.