अकोला: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी जिल्ह्यातील १ हजार ३९३ बुथवर सुरक्षित लसीकरण मोहीम शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडली. मोहिमेंतर्गत १, १२,२६० बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला असून, एकूण ८५ टक्के लसीकरण झाले.पोलिओच्या संपूर्ण निर्मूलनासाठी रविवारी सकाळी ८ वाजता कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात सर्वत्र ० ते ५ वर्षे वयोगटातील तसेच पाच वर्षांवरील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला. उन्हाचा पारा वाढल्यामुळे सकाळी ८ वाजतापासूनच पालकांनी बालकांना पोलिओ डोससाठी बुथवर गर्दी केल्याचे दृश्य दिसून आले. यंदा १ लाख ८७ हजार ९२६ बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १, १२, २६० बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य संतोष वाकोडे, सरपंच अंबादास उमाळे, पंचायत समिती सदस्य रेणुका उमाळे व डॉ. मनीष शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. भूषण सोनोने, डॉ. नीता केवलानी, जिल्हा विस्तार अधिकारी प्रकाश गवळी, नरेंद्र बेलोरकर, योगेश कुळकर्णी, विजय घुगे, अविनाश उजाडे, सचिन उनवणे व संजय डाबेराव यांनी परिश्रम घेतले.आजपासून पाच दिवस घरोघरी लसीकरणपोलिओ लसीकरणाच्या दिवशी अनेक बालकांना लस देण्यात आली नाही. लसीकरणापासून ही बालके दूर राहू नये, यानुषंगाने सोमवार, ११ मार्चपासून घरोघरी जाऊन ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येईल. लसीकरणाचा हा कार्यक्रम सलग पाच दिवस चालणार आहे. यासाठी ट्राझिट टीम व मोबाइल टीम सज्ज आहे.असे झाले लसीकरण!जिल्ह्यात १ हजार ३९३ बुथवर लसीकरण झाले. यामध्ये ग्रामीण भागात ० ते ५ वर्षांखालील ९,१,६१६ बालकांना, तर पाच वर्षांवरील १,६३६ बालकांना लसीकरण करण्यात आले. शहरी भागात ० ते ५ वर्षांखालील १,८,६५१ बालकांना, तर पाच वर्षांवरील ३५८ बालकांना असे एकूण १ लाख १२ हजार २६० बालकांना पोलिओ लस देण्यात आली.