अकोला- काँग्रेस महाआघाडीमध्ये भारिप-बमसंचा सहभाग हा एमआयएममुळे अडचणीचा ठरत असल्याच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसचे माजी राज्यमंत्री व ज्येष्ठ नेते सुबोध सावजी यांनी मंगळवारी अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीतील तपशील उघड करण्याबाबत सावजी यांनी मौन बाळगले असून, या दोन नेत्यांमधील चर्चा ही महाआघाडीमधील अॅड.आंबेडकरांचा समावेश की वंचित बहुजन आघाडीसाठी बुलडाण्यात पर्यायाचा शोध या दृष्टीने होती का, याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.माजी राज्यमंत्री व बुलडाण्यातील ज्येष्ठ नेते असलेले सुबोध सावजी हे नेहमीच आक्रमक व चर्चेत राहणारी भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या वर्षभरापासून त्यांनी नळ योजनांमधील भ्रष्टाचार, या मुद्दावर बुलडाण्यात रान उठवले आहे. या योजनांच्या चौकशीसाठी १२ दिवसांचे उपोषणही केले होते. त्यांचा पुत्र शैलेष सावजी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला असला तरी सुबोध सावजी यांचा पक्षात पुन: प्रवेश झालेला नाही, सध्या त्यांची वाटचाल लोकसभा निवडणूक लढविण्याकडे असल्याने अॅड.आंबेडकर यांच्यासोबत त्यांनी घेतलेली राजकीय भेट नेमकी कशासाठी, याची चर्चा सुरू झाली आहे.वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भारिप-बमसं सर्वच लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांचा शोध घेत असून, त्या शोधाचाच एक भाग म्हणून या भेटीकडे पाहिले जात आहे. दरम्यान, सुबोध सावजी यांच्यासोबत संपर्क साधला असता, अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सर्वच राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केले; मात्र तपशील देण्यास नकार दिला. योग्य वेळी माहिती देऊ, असे ‘लोकमत’ शी बोलताना त्यांनी सांगितले.