अकोला: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच रविवारी सायंकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील राजकीय नेत्यांचे होर्डिंग, बॅनर-फलक काढण्याची कारवाई केली. ही कारवाई शहरातील चारही झोनमध्ये करण्यात आली.आगामी एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगाने रविवारी सायंकाळी लागू केली. या काळात कोणत्याही पक्षाकडून माहिती किंवा मतदारांना प्रलोभन दिले जाईल, अशा स्वरूपाच्या राजकीय जाहिराती होर्डिंग-फलकाद्वारे प्रकाशित करता येत नाहीत. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश लक्षात घेता मनपा प्रशासनाने राजकीय नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शहराच्या कानाकोपऱ्यात उभारलेले होर्डिंग-फलक काढून घेण्याची कारवाई केली. सदर कारवाई पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, पश्चिम झोनचे दिलीप जाधव, उत्तर झोनचे वासुदेव वाघाडकर तसेच दक्षिण झोनचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहादूर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग प्रमुख राजेंद्र टापरे व पथकातील कर्मचाऱ्यांनी पार पाडली.राजकीय पक्षांनी दिल्या सूचनामहापालिका क्षेत्रात उभारण्यात आलेले राजकीय होर्डिंग काढून घेण्यासोबतच विविध विकास कामांचे लावण्यात आलेले फलक झाकून ठेवण्याचे निर्देश भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. रात्री उशिरापर्यंत शहराच्या कानाकोपºयातील फलक झाकण्याचे काम सुरू होते.