राजकीय यात्रा अन् यात्रांचे राजकारण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:24 PM2019-08-06T12:24:37+5:302019-08-06T12:24:43+5:30
महाराष्टÑाला असलेल्या यात्रांच्या परंपरेचे राजकीय जत्रेत रूपांतर करणाऱ्या अशा अनेक यात्रांचे अकोलेकर साक्षीदार आहेत.
- राजेश शेगोकार
अकोला: राजकारण हे सतत प्रवाही असते, ते कधीही थांबत नाही. निवडणुकांचे वर्ष आले की याच प्रवाहांच्या ‘लाटा’ कशा निर्माण होतील याचा विचार करून राजकीय पक्ष विविध उपक्रम हाती घेत असतात. त्या उपक्रमांमध्ये अलीकडच्या काळात सर्वात लोकप्रिय झालेला उपक्रम म्हणजे यात्रा ! महाराष्टÑाला असलेल्या यात्रांच्या परंपरेचे राजकीय जत्रेत रूपांतर करणाऱ्या अशा अनेक यात्रांचे अकोलेकर साक्षीदार आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेची आणखी एक भर पडली आहे.
पश्चिम वºहाडात अकोला हे राजकीय घडामोडींचे मोठे केंद्र राहिले आहे. पश्चिम वºहाडातील एकमेव विमानतळ अकोल्यात असल्याने राष्टÑीय व राज्य स्तरावरील मोठ्या नेत्यांना पश्चिम वºहाडासोबत कनेक्ट राहण्यासाठी अकोल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच राज्यात निघालेल्या एकही यात्रेला अकोल्याला वगळता आले नाही. किंबहुना अनेक यात्रा व दिंडीचा प्रारंभ किंवा समारोप हा पश्चिम वºहाडातच झाला आहे. ८० च्या दशकात भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर यांनी ‘खामगाव ते आमगाव’ अशी ‘कापूस यात्रा’ काढली होती. तब्बल ३५० किलोमीटरची ही पायी यात्रा नागपूरच्या विधानभवनावर धडकली होती. या यात्रेनंतरच भाऊसाहेबांना राज्यस्तरीय नेतृत्वाची संधी मिळाली. ही यात्रासुद्धा अकोल्यातून गेली होती. भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी १९९२ मध्ये एकता यात्रा काढली होती. या यात्रेमध्ये जोशी यांच्या सोबत नरेंद्र मोदी सहभागी झाले होती. तेव्हा मोदी यांची ओळख संघपरिवारापूरतीच मर्यादित होती. ही यात्रा २५ जानेवारी रोजी अकोल्यात रात्री उशिरा दाखल झाली होती. राजनाथसिंह यांनीही काढलेली यात्रा अकोल्यात आली होती. येथील विश्रामगृहावर त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला होता. या यात्रांसोबतच भाजपाचा जनाधार वाढविण्यासाठीच नव्हे तर सत्तेपर्यंत पोहचविण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांची संघर्ष यात्रा महत्त्वाची ठरली होती. १९९४ मध्ये निघालेल्या या यात्रेने महाराष्ट्र ढवळून काढला होता. या यात्रेनंतर १९९५ मध्ये राज्यात झालेल्या निवडणुकीत युतीची सत्ता आली. गोपीनाथ मुंडे यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांच्या क न्या पंकजा मुंडे यांनी २०१४ मध्ये पुन्हा संघर्ष यात्रा काढली. या यात्रेचा प्रारंभ बुलडाण्यातील सिंदखेड राजा येथून झाला होता. ही यात्राही अकोल्यातील बाळापूर, पातूर मार्गे राज्यात पुढे १४ दिवस फिरली होती. या यात्रेनंतरही भाजपाची सत्ता राज्यात स्थापन झाली व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आता मुख्यमंत्रीच खुद्द यात्रेकरू झाले आहेत. त्यामुळे या यात्रेचा राजकीय फायदा किती मिळतो, हे काळच ठरवेल.
शिवसेनेची दिंडी
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सध्या ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरू केली आहे. शिवसेनेतही यात्रेची परंपरा आहेच. यापूर्वी विदर्भात शिवसेनेला व्यापक जनाधार मिळवून देण्यात दिवाकर रावते यांनी काढलेली कापूस दिंडी महत्त्वाची ठरली होती. गुरुकुंज मोझरी येथून कापसाला ६ हजार भावाच्या मागणीसाठी २०११ मध्ये दिवाकर रावते यांनी कापूस दिंडी काढली. तिचा समारोप शेगावात झाला होता. या समारोपाला उद्धव ठाकरे आले होते. या दिंडीनंतरच विदर्भातील शेतकरी सेनेकडे वळला. रावते यांनी त्यानंतर शेतकरी आत्महत्यांच्या विषय हाती घेत ‘सांत्वना दिंडी’सुद्धा काढली होती.
काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा
सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसला यात्रा व दिंड्या काढाव्या लागल्या नाहीत; मात्र सरकारची यशोगाथा सांगण्यासाठी गोविंदराव आदिक यांनी अशीच जनसंपर्क यात्रा काढली होती. तीसुद्धा अकोल्यात आली होती, असा संदर्भ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देतात. देशात भाजपाची सत्ता आल्यानंतर काँग्रेस संघर्षाच्या पवित्र्यात आली. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रा काढली होती. ७ डिसेंबर २०१८ रोजी ही यात्रा अकोल्यात आली होती. या यात्रेमुळे काँग्रेसचा सुरू असलेला संघर्ष संपून सत्ता आली नाही; मात्र कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी यात्रा उपयुक्त ठरली.
यात्रांमुळेच फुंडकर, मुंडे यांच्या नेतृत्वावर राज्यस्तरीय मोहोर
राजकीय यात्रांचा लाभ पक्षाला झाला की यात्रेच्या प्रणेत्यांचे पक्षातील स्थान अधिक बळकट होते याचा अनुभव राजकीय क्षेत्राला अनेकदा आला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर हे खामगावचे आमदार होते. त्यांनी खामगाव ते आमगाव ही कापूस दिंडी काढली अन् त्यांची राजकीय कारकीर्द बहरली. पुढे अकोल्याचे खासदार, पणन महामंडळाचे अध्यक्ष, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व अखेर कॅबिनेट मंत्री अशी यशाची चढती कमान त्यांनी अनुभवली. या कापूस दिंडीची सुरुवात खामगावातून होती. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर पंकजा मुंडे यांचा पक्षातही संघर्ष सुरू झाला होता. त्याच वेळी त्यांनी सिंदखेडराजा येथून संघर्ष यात्रा काढली. त्या यात्रेच्या शुभारंभाला देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष म्हणून उपस्थित होत.पुढे सत्ता आल्यानंतर मुंडे यांच्या राज्यस्तरीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले.