संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर गावपातळीवर पुढार्यांकडून निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली असून, गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकांचे राजकारण तापू लागले आहे.पाच वर्षांचा कालावधी संपणार्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातल्या सातही तालुक्यांतील २७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने निवडणुका होत असलेल्या गावांमध्ये इच्छुक उमेदवारांसह गाव पातळीवरील पुढार्यांकडून निवडणुका लढविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यानुषंगाने ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पॅनल गठित करणे, पॅनलचे जास्तीत -जास्तीत उमेदवार निवडून आणण्यासाठी उमेदवार निश्चित करण्याच्या कामात गाव पातळीवरील पुढारी गुंतले आहेत. त्यामध्ये पॅनलची उमेदवारी मिळवून वॉर्डात विजय कसा मिळविता येईल, या दृष्टीने इच्छुक उमेदवारांकडून प्रयत्न केले जात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होण्यास केवळ सहा दिवसांचा कालावधी उरला असतानाच ग्रामपंचायत निवडणुकांचे राजकारण गावागावांत तापू लागले आहे. या निवडणुकांमध्ये थेट जनतेतून सरपंचांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची मोर्चेबांधणी संबंधित पॅनल-गटांच्या पुढार्यांकडून केली जात आहे.
सरपंचांची थेट जनतेतून निवड; इच्छुकांचे बाशिंग गुडघ्याला!ग्रामपंचायतींच्या या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरपंच पदांसाठी थेट जनतेतून निवड करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने सरपंच पदांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी गावागावांतील अनेक इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवड होणार असल्याने, गावातील मतदारांसमोर जाऊन, ही निवडणूक लढविण्याची तयारी इच्छुक उमेदवारांनी सुरू केली आहे.