- राजेश शेगोकार
अकोला: मुलाची चप्पल बापाला व्हायला लागली की, मुलगा मोठा झाला, हे बापानं समजावं, असं म्हटलं जातं; मात्र अनेकदा अनेक 'बाप' आपल्या मुलांचं 'मोठे'पण मान्य करीतच नाही. मग यात मुलगा अन् बापही अनेकदा स्वत:ची ओळख हरवून बसतो. राजकारणात असं अनेकदा पहायला मिळतं; मात्र अकोल्यातील शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी काळाची पावलं ओळखत आपल्या मुलाला ‘मोठं’ करीत थेट आमदार केलं. आमदार गोपीकिशन बाजोरिया अकोल्यासह पश्चिम वºहाडच्या राजकारणात प्रसिद्ध आहेत, ते आपल्या 'व्यवहारी' आणि 'धोरणी' राजकारणासाठी. विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विप्लव बाजोरिया यांचा विजय हा आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या ‘इलेक्शन मॅनेजमेंट’चा परिपाक आहे. विप्लव यांचा हा विजय राजकारणातील अनेक बदलांची नांदी ठरणारा असून, पश्चिम वºहाडातील शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणातील संदर्भ बदलवणारा आहे.हिंगोली-परभणी विधान परिषदेची जागा शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊन आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना मतदारसंघाची चाचपणी करण्याची जबाबदारी दिली होती. आ.बाजोरिया यांनी पक्ष प्रमुखांना दोन दिवसात अहवाल देऊन या मतदारसंघाची जबाबदारी घेत त्यांचे चिरंजीव विप्लव यांनाच रिंगणात उतरविण्याची तयारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दर्शविली. ठाकरे यांनी बाजोरिया यांच्यावर विश्वास टाकला. तो त्यांनी सार्थ ठरवित हिंगोली-परभणीची जागा शिवसेनेला जिंकून दिली. खरंतर परभणी-हिंगोली मतदारसंघ शिवसेनेसाठी अतिशय प्रतिकूल होता. या मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस १६२, काँग्रेस १३५, शिवसेना १०२, भाजप ५१ आणि अपक्ष ५२ सदस्यांचे संख्याबळ होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे संख्याबळ जास्त होते; मात्र अकोला-बुलडाणा-वाशिम अशा तीन निवडणुकांचा अनुभव पाठीशी असलेल्या गोपीकिशन बाजोरियांनी मैदान मारत थेट मुलालाही आमदार केलं. बाहेरचा उमेदवार, अनोळखी उमेदवार असा ठप्पा मारणाऱ्या विरोधकांना नामोहरम करीत बाजोरिया हे सेनेतील नवे ‘मॅनेजमेंट गुरू’ ठरले आहेत. यासोबतच उद्धव ठाकरेंच्या विदर्भासह आता मराठवाड्यातील शिवसेनेच्या प्रमुख विश्वासूंमध्ये गोपीकिशन बाजोरिया हे नावही नव्यानं सामिल झालं असून, या विजयानं आता अकोल्यात आमदार गोपीकिशन बाजोरिया हे शिवसेनेचे सर्वात शक्तीशाली नेते बनले आहेत. विशेष म्हणजे ११ मे रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील पदाधिकाºयांशी चर्चा करून स्वबळावर लढण्यासाठी कामाला लागा, असा संदेश दिला होता, त्यानुसार शिवसैनिक कामाला लागले असून, आता संपर्कप्रमुख दिवाकर रावते हे प्रत्येक मतदारसंघनिहाय आढावा घेण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत. येत्या २६ मे रोजी ते अकोल्यात येणार आहेत. यावेळी आ.बाजोरिया यांच्यावर सर्वार्थाने अकोल्याची जबाबदारी देण्याची शक्यता अधिक आहे. आमदार बाजोरिया यांनी स्वत:च अकोट मतदारसंघात आपल्या फेºया वाढविल्या असून, ते विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे संकेत असून, लोकसभेसाठी आमदार दाळू गुरुजी, विजय मालोकार यांच्यासह बाजोरिया यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे येणाºया काळात सिनिअर बाजोरिया यांच्या हाती शिवसेनेची सर्व सूत्रे राहतील, यात शंका नाही.