वाशिम - जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार पुनर्निरीक्षण यादीच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु असून, यामध्ये काही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) कामचुकारपणा करीत असल्याचे निदर्शनात येत आहे. विहित मुदतीत अपेक्षीत उद्दिष्टपूर्ती न करणाऱ्या कामचुकार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर यापुढे शासन नियमानुसार फौजदारी कारवाई करण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले.
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना घरोघरी भेटी देवून मतदारांसंबंधी माहिती गोळा करावयाची आहे. गोळा केलेली माहिती बी.एल.ओ. हायब्रीड अॅपमध्ये भरणे अनिवार्य आहे. वाशिम जिल्ह्यात लोकसंख्या वाढीच्या दराच्या अंदाजाने जवळपास २.८७ लाख कुटुंबांतील मतदारांची माहिती २० जूनपर्यंत गोळा करावी लागणार आहे. यातील ७५ हजार कुटुंबांची माहिती आॅनलाईन हायब्रीड बी.एल.ओ. अॅप मध्ये भरण्यात आली. अजुनही बरेच काम बाकी असुन २० जूनपर्यंत उर्वरीत काम पुर्ण करण्याचे आव्हान बी.एल.ओ. पुढे आहे. घरोघरी भेटी देण्याच्या कार्यक्रमात मालेगांव, कारंजा व मंगरूळपीर या तालुक्याचे काम ३० टक्के पेक्षा जास्त आहे तर मानोरा, वाशिम व रिसोड तालुक्याची कामगिरी अतिशय संथ असून, बी.एल.ओ. यांनी कामात सुधारणा केली नाही तर यापुढे कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सर्व बी.एल.ओं.ची माहिती सहा तालुक्यातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी मागितली आहे. बी.एल.ओंची माहिती घेवुन त्यांचेवर आवश्यकतेनुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० चे कलम ३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. गुन्हा दाखल झाल्यास व अपराध सिध्दीनंतर दोन वर्षाचा कारवास आणि दंडाची तरतुद असून सेवेतून निलंबन किंवा बडतर्फी होवु शकते अशी माहिती उपजिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांकरीता मतदारांची यादी अचूक होण्याच्या दृष्टिने सदर कारवाईचे पाऊल उचलण्यात येत असल्याचे हिंगे यांनी स्पष्ट केले. निवडणुक आयोग अचुक मतदार यादीसाठी पाठपुरावा करत असुन आगामी निवडणुका यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे ते म्हणाले.
मतदारांनीदेखील जागरूक राहून प्रशासनास सहकार्य करावे. मतदार यादीत आपले छायाचित्र नसेल किंवा कृष्णधवल छायाचित्र असल्यास अशा मतदारांनी दोन रंगीत छायाचित्र संबंधित तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत जमा करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी केले.