अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी अकोला तालुक्यातील मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांना शुक्रवार, २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मतदान प्रक्रिया आणि इलेक्ट्राॅनिक मतदान यंत्र (इव्हीएम) हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे १४ गट आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या २८ गणांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सातही तालुक्यात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ३ गट आणि पंचायत समितीच्या ५ गणांच्या पोटनिवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांना २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात दोन सत्रात मतदान प्रक्रिया आणि ‘इव्हीएम’ हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी सांगितले.