अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये २ हजार ७० जागांपैकी ३२० जागांवर उमेदवारांची अविरोध निवड निश्चित झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने, नऊ जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या १ हजार ७४१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील २४४ ग्रामपंचायतींच्या २,०७० जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया ४ जानेवारी रोजी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतींच्या ३२० जागांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचा अर्ज राहिल्याने, संबंधित ३२० उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून अविरोध निवड निश्चित झाली आहे. तसेच जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एक याप्रमाणे नऊ जागांवर एकही उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने, नऊ जागांवर ग्रामपंचायत सदस्यांची पदे रिक्त राहणार आहेत. त्या आनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत १ हजार ७४१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
तालुकानिहाय अशी
राहणार रिक्तपदे !
जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात दोन, अकोट तालुक्यात दोन, अकोला तालुक्यात तीन व बाळापूर तालुक्यात दोन अशा नऊ जागांवर एकही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसल्याने, नऊ ग्रामपंचायत सदस्यांची पदे रिक्त राहणार आहेत. त्यामध्ये अनुसूचित जमाती पाच, नागरिकांचा मागास प्रवर्ग २ व सर्वसाधारण प्रवर्गातील दोन सदस्यपदांचा समावेश आहे.