अकोला, दि. ५- जिल्हय़ातील अनेक महामार्गांंंलगत वीटभट्टय़ांचा गराडा असताना त्यापैकी केवळ ४६ ची कागदोपत्री माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आहे. महसूल विभागाने दिलेली ही माहिती अत्यंत त्रोटक असून, त्याआधारे आता प्रदूषण नियंत्रण मंडळ कायद्याची अंमलबजावणी करणार आहे हे विशेष!पारंपरिक वीटभट्टय़ांच्या स्थापनेबाबतच्या नियमांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९८१ च्या कलम ५४ मध्ये सुधारणेची अधिसूचना सप्टेंबर २0१६ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यावेळीच अंमलबजावणीचे निर्देशही देण्यात आले; मात्र त्यानंतरही हवेची गुणवत्ता बिघडविणार्या वीटभट्टय़ांसंदर्भात कोणतीही कारवाई अद्याप प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केली नाही. त्यासाठी महसूल विभागाकडून माहिती मागविण्यात आली. ती देण्यास टाळाटाळ केल्यानंतर आता कागदोपत्री जिल्हय़ात केवळ ४६ वीटभट्टय़ा आहेत. त्यापैकी सहामध्ये वीज केंद्रातील राखेपासून विटांची निर्मिती केली जाते. कायद्याप्रमाणे राष्ट्रीय-राज्य महामार्गापासून दोनशे मीटर अंतरावर वीटभट्टीची जागा निश्चित झाली आहे, तर पारंपरिक वीटभट्टय़ांना मानवी वस्तीपासून कमीत कमी दोनशे मीटरच्या पुढे निर्मिती करता येईल.महामार्गालगत वीटभट्टय़ांची गर्दी कायद्यानुसार वीटभट्टय़ांना आता प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती घ्यावी लागणार आहे; मात्र सद्यस्थितीत अकोला जिल्हय़ातील अनेक गावे, महामार्गालगतच वीटभट्टय़ांची प्रचंड गर्दी आहे. त्यामध्ये बाळापूर, चोहोट्टा, हाता, अंदुरा, भौरद, अकोला शहर, मनात्री या ठिकाणी महामार्गालगतच वीटभट्टय़ा आहेत. वीटभट्टय़ांसाठी बंधनकारक नियम*मानवी वसाहतीलगतच्या पर्यावरणातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी विटांचा आकार व एकावेळी निर्मितीच्या संख्येनुसार वीटभट्टीधारकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती असल्याशिवाय वीटभट्टी सुरू करता येत नाही, असा नियम आहे. *त्यामध्ये ९ : ४ : ६ इंच आकाराच्या २५ हजार आणि ९ : ४ : ३ इंच आकाराच्या ५0 हजारांपेक्षा जास्त नगांची निर्मिती करणार्यांना राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानके आणि कायद्यातील अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येने विटांची निर्मिती करणार्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीची गरज नसली, तरी कायद्यातील अटी व शर्ती बंधनकारक आहेत.
प्रदूषण मंडळाला ४६ वीटभट्टय़ांचीच माहिती
By admin | Published: March 06, 2017 2:07 AM